निलंगा,दि.०२
निलंगा नगरपरिषदेची निवडणूक संपूर्ण तयारीनिशी काही तासावर आली होती. पण अचानक निवडणूक आयोगाने कोणतेही ठोस कारण न देता स्थगिती जाहीर केली, ज्यामुळे शहरभर राजकीय गोंधळ पसरला आणि जनतेत संभ्रम निर्माण झाला.
या निर्णयावर माजी मंत्री व आमदार संभाजी पाटील- निलंगेकर यांनी आज पत्रकार परिषदेत तीव्र नाराजी व्यक्त केली. आणि स्पष्ट इशारा दिला की,
“हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. आम्ही याविषयी थेट उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.”
आमदार संभाजी पाटील पुढे म्हणाले की,”निलंग्यातील निवडणूक पूर्ण तयारीनिशी उंबरठ्यावर आली होती. चिन्हवाटप, उमेदवारी अर्ज, कायदेविषयक सर्व माहिती वेळेत आयोगाला दिलेली होती. तरीही अकस्मात निवडणूक रद्द केली गेली. हा निर्णय अन्यायकारक आहे.” ते पुढे म्हणाले की,”महाराष्ट्रात पहिल्यांदाच २४ नगराध्यक्ष पदांच्या आणि २०४ प्रभागांच्या निवडणुका रद्द झाल्या आहेत. निलंग्यात परिस्थिती स्वच्छ होती; तरीही निवडणूक रद्द करणे योग्य नाही आणि हे जनतेच्या हिताविरुद्ध आहे.”
यावेळी आमदार निलंगेकर पुढे म्हणाले की,
“विरोधक माझ्यावर कितीही टीका करोत, पण आयोगाच्या आदेशावरून निवडणूक रद्द झाली आहे. विरोधक जनतेत चुकीचा प्रचार करत आहेत आणि आज शहर बंद करून व्यापाऱ्यांना तसेच सामान्य नागरिकांना वेठीस धरले गेले आहे. राजकारणासाठी जनतेला त्रास देणे हे सहन करण्याजोगे नाही.”ते पुढे म्हणाले
“आमच्या जाहीरनाम्यात आता ठाम वचन आहे की, निलंगा नगरपालिका कधीही बंदला समर्थन देणार नाही आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. २० तारखेला जनता मतदानाद्वारे या अन्यायकारक निर्णयाचे उत्तर देईल.”
या पत्रकार परिषदेत आमदार संभाजी पाटील- निलंगेकर यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.
“पूर्वी काँग्रेसकडून मुस्लिम आणि इतर समाजांमध्ये चुकीची माहिती पसरवली गेली होती. आजही विरोधक जनतेत अपप्रचार करून दिशाभूल करीत आहेत. पण निलंग्याची जनता भोळी नाही. अपप्रचार करणाऱ्यांना आणि दिशाभूल करणाऱ्यांना या निवडणुकीत कठोर धडा शिकवेल.
उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी
संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले,
“आयोगाचा निर्णय चुकीचा आहे. आम्ही छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात तातडीने अर्ज दाखल करणार आहोत. सत्य बाहेर आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.”
या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, वीरभद्र स्वामी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.