ग्रामस्थांशिवाय १० मिनिटांत ग्रामसभा; ग्रामसेवक–सरपंचांचा कारभार चव्हाट्यावर..
निलंगा,दि.१५
गाव विकासाच्या नावाखाली लोकशाहीची सरळसरळ थट्टा करण्याचा धक्कादायक प्रकार मौजे मसलगा, ता. निलंगा, जि. लातूर येथे उघडकीस आला आहे. दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी “आमचा गाव आमचा विकास (HPDP) सन २०२६–२७” या महत्त्वाच्या आराखड्यासाठी आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा ग्रामसभा सदस्य व ग्रामस्थांशिवाय अवघ्या १० मिनिटांत कागदावरच आटोपल्याचे समोर आले आहे.
ग्रामसभेला गावातील नागरिकांचा कौल असतो; मात्र येथे तोच अधिकार पायदळी तुडवण्यात आला. केवळ पाच ते सहा व्यक्तींच्या उपस्थितीत, कोणतीही चर्चा न करता, प्रश्न–सूचना न ऐकता, सरपंच व ग्रामसेवकांनी विकास आराखडा मंजूर केल्याचे दाखवून लोकशाही प्रक्रियेचा गळा घोटल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
विशेष म्हणजे, ग्रामसभेची पूर्वसूचना देण्यात आलेल्या वेळेस संबंधित ग्रामसेवक गावात हजर नसल्याचे, तसेच नियमितपणे गावाच्या कामकाजाकडे दुर्लक्ष होत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. “गावाची जबाबदारी ज्याच्यावर आहे, तोच वेळेवर गावात येत नाही; मग विकास कुठून होणार?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
या गंभीर प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते व निलंगा तालुका अध्यक्ष (छावा) तुळशिदास किसनराव साळुंके यांनी पंचायत समिती निलंगा येथे जोरदार लेखी तक्रार दाखल केली असून, दोषी ग्रामसेवकावर तात्काळ निलंबन, सेवेतून बडतर्फी आणि सरपंचावरही चौकशीची मागणी केली आहे. तसेच ही बेकायदेशीर ग्रामसभा रद्द करून नियमाप्रमाणे सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नव्याने ग्रामसभा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर छावा स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा देण्यात आला आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
मसलग्यात घडलेला हा प्रकार म्हणजे केवळ ग्रामसभेचा गैरप्रकार नसून, गावकऱ्यांच्या हक्कांवर झालेला उघड हल्ला आहे, अशी भावना आता सर्वत्र व्यक्त होत आहे.