निलंगा,दि.१८
भारताचे माजी केंद्रीय मंत्री व लातूरचे सुपुत्र, माजी खासदार शिवराजजी पाटील चाकूरकर यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानिमित्त कासार शिरसी येथे ग्रामस्थांच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
या शोकसभेस कासार शिरसी शहरातील नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. उपस्थितांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
शोकसभेत वक्त्यांनी चाकूरकर यांनी कासार शिरसी व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सामाजिक सलोखा, लोकशाही मूल्ये आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिले, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्यांच्या जाण्याने एक अभ्यासू, चारित्र्यवान व निष्कलंक नेतृत्व हरपल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या श्रद्धांजली कार्यक्रमास निलंगा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शिवकुमार चिंचनसुरे, सोसायटीचे चेअरमन गुरुनाथ आप्पा मिलगिरे, व्हॉइस चेअरमन ओमप्रकाश चिंचनसुरे, व्यापारी अध्यक्ष बाळूमामा वेल्हाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. भीमराव पाटील, माजी सरपंच बडे साहेब लकडारे, प्रदीपजी होळकुदे, विजयकुमार व्यवहारे, एस. एस. बिराजदार, ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठलरावजी उजळंबे, प्रकाश कडकडे, मधुकर किवडे, युसुफ मुगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शोकसंदेश व्यक्त करताना वक्त्यांनी शिवराज पाटील चाकूरकर हे आझाद वृत्तीचे, निर्भीड, चारित्र्यवान व जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व होते, असे नमूद केले. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना कायम मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.