२४ डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा थेट हल्लाबोल..
निलंगा, दि.१९
ग्राहकांची पद्धतशीर लूट, ऑनलाईन ठगगिरी, भेसळखोरी व व्यापारी मनमानी विरोधात थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्धार करत दि.२४ डिसेंबर २०२५ रोजी निलंगा येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कडक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शाखा निलंगा यांच्या नेतृत्वाखाली होणारा हा कार्यक्रम तहसील प्रशासनाच्या सहकार्याने राबविण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
२४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन. मात्र ग्राहकांचे हक्क अजूनही कागदावरच राहात असल्याची वस्तुस्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमातून ग्राहकांचे कायदेशीर हक्क, तक्रार निवारणाची स्पष्ट प्रक्रिया, ऑनलाईन फसवणूक व सायबर गुन्हे,भेसळ प्रतिबंध, हमी–वॉरंटीचे नियम, तसेच बिल व पावती न देणाऱ्यांविरोधात कारवाईची तरतूद याबाबत नागरिकांना थेट आणि ठोस माहिती दिली जाणार आहे. फसवणूक सहन करायची नाही, हक्कांसाठी लढायचे हा संदेश ठामपणे दिला जाणार आहे.
या कडक जनजागृती मोहिमेसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत या राष्ट्रीय संघटनेचे पदाधिकारी निलंग्यात दाखल होणार असून विद्यार्थी, सर्वसामान्य ग्राहक, व्यापारी व सेवाग्राहक यांच्यात ग्राहक जागृतीचा एल्गार पेटवण्याचा आयोजकांचा निर्धार आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शाखा निलंगा यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयास अधिकृत निवेदन देण्यात आले आहे. प्रशासनाकडून आवश्यक मान्यता, स्थळ व सहकार्य मिळाल्यास हा उपक्रम ग्राहकांच्या लढ्याला नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
ग्राहकांनी अन्याय गप्प बसून सहन न करता कायदेशीर मार्गाने थेट तक्रार दाखल करावी, असे स्पष्ट आवाहन ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष पुरी सुधीर माधव यांनी केले. सजग ग्राहक म्हणजे शोषणमुक्त समाजाची ताकद असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
या निवेदनावर पंढरीनाथ जाधव, शिवराज स्वामी, किशन मोरे, ॲड. सुशील सोमवंशी, छाया शिंदे, मोहन क्षिरसागर,श्रीशैल्य बिराजदार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला आहेत.