भाजपाचे निर्विवाद वर्चस्व; 23 पैकी 15 जागांवर दणदणीत विजय
निलंगा,दि.२१
निलंगा नगरपरिषदेच्या 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विरोधकांना धूळ चारत नगरपरिषदेत निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली आहे. एकूण 23 जागांपैकी तब्बल 15 जागांवर भाजपाने विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले, तर काँग्रेसला 8 जागांवरच समाधान मानावे लागले. निलंग्याच्या जनतेने पुन्हा एकदा विकासाच्या नावावर भाजपावरच विश्वास टाकल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
नगराध्यक्ष पदाच्या थेट जनतेतून झालेल्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार संजयराज प्रमोद हलगरकर यांनी 2026 मतांच्या फरकाने जोरदार मुसंडी मारत विजय खेचून आणला.
हा विजय केवळ व्यक्तीचा नसून भाजपाच्या संघटनशक्तीचा आणि कार्यकर्त्यांच्या मैदानातील मेहनतीचा असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.
प्रभागनिहाय निकालात भाजपाने अनेक प्रभागांमध्ये क्लीन स्वीप करत विरोधकांना हादरवले. प्रभाग क्रमांक 2, 3, 4, 8 आणि 10 मध्ये भाजपाच्या उमेदवारांनी दोन्ही जागांवर कब्जा करत काँग्रेसच्या रणनीतीवर मोठा प्रश्नचिन्ह उभे केले. काही ठिकाणी काँग्रेसने चुरशीची लढत दिली असली, तरी भाजपाचे मताधिक्य हे पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिले
प्रभाग क्रमांक 7 मध्ये काँग्रेसला दोन्ही जागांवर विजय मिळवता आला, तर प्रभाग क्रमांक 11 मध्ये तिरंगी लढतीत भाजपाने एक जागा जिंकली. मात्र एकूण निकाल पाहता काँग्रेसची घसरण आणि भाजपाची सरशी ठळकपणे अधोरेखित झाली आहे.
निकाल जाहीर होताच निलंग्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. फटाक्यांचा आवाज, घोषणांचा गजर आणि विजयी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करून शहरातून मिरवणूक काढली त्यामुळे शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. दुसरीकडे काँग्रेस गोटात मात्र शांतता आणि आत्मपरीक्षणाची चर्चा सुरू असल्याचे चित्र दिसून आले.
आता भाजपला आगामी कार्यकाळात निलंगा शहराचा विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, नागरी सुविधा आणि रोजगाराच्या प्रश्नांवर ठोस निर्णय अपेक्षित असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. निकालाने सत्ता दिली आहे, आता कसोटी विकासावर आहे, अशी भावना निलंग्याच्या जनतेतून व्यक्त होत आहे.
मागील २०१६ च्या निवडणुकीची तुलना करता काँग्रेस पक्षाचे केवळ ०२ नगरसेवक विजयी झाले होते.मात्र या निवडणुकीत ०८ नगरसेवकांनी विजय मिळवल्यामुळे काँग्रेस पक्षाची परिस्थिती सुधारली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विजयासाठी भरपूर प्रयत्न करूनही त्यांना विजय मिळवता आला नसून रेशमे लिंबनप्पा यांना केवळ २७१२ मतांवर समाधान मानावे लागले. तर वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर यांनी निवडणुकीची धुरा स्वतःकडे घेऊनही या निवडणुकीत विजय मिळवता आला नाही..