एकच फोटो, वेगवेगळी नावे आणि शासनाची लूट!
निलंगा, दि. २२
निलंगा तालुक्यातील वनविभागाच्या रोपवाटिकांमध्ये बोगस मजूर, बनावट मस्टर आणि खोट्या बिलांद्वारे शासनाच्या पैशांची लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष अतुल सोनकांबळे यांनी उपविभागीय अधिकारी, निलंगा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
उमरगा (हा), लांबोटा, कासार सिरसी, गौर व काटेजवळगा येथील रोपवाटिकांमध्ये मस्टरवर २० ते २५ मजूर दाखवले जात असताना प्रत्यक्षात केवळ १० ते १२ मजूरच कामावर असल्याचा प्रकार उघड झाला आहे. उर्वरित मजुरांची नावे कागदावर असून, खोट्या सह्या, खोट्या नोंदी व एकाच व्यक्तीचा फोटो वापरून बिले काढली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घोटाळ्यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एकाच व्यक्तीचा फोटो अनेक मस्टरवर वापरण्यात आला असून, फोटोतील व्यक्ती प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कधीच दिसून न आल्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच मजूर नाहीत, पण पैसे मात्र उचलले जात आहेत.
उमरगा (हा) येथे ५५ हजार रोपांच्या स्थलांतर कामात ९ महिन्यांत २५ मजूर दाखवले गेले, मात्र प्रत्यक्षात निम्म्याहूनही कमी मजूर असल्याचा आरोप आहे. तसेच काटेजवळगा, लांबोटा व कासार सिरसी येथील NUR रोपवाटिकांमध्येही हाच गैरप्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याशिवाय, इतर व्यक्तींचे आधारकार्ड व बँक खाते वापरून शासनाची रक्कम वर्ग केली जाते आणि त्यातील मोठा हिस्सा अधिकाऱ्यांकडून हडप केला जातो, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मजुरांच्या मस्टरवरील सह्या प्रत्यक्ष मजुरांच्या नसून, अधिकाऱ्यांकडूनच केल्या जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी दोषींवर तात्काळ निलंबन, सेवेतून बडतर्फी व फौजदारी गुन्हे दाखल न झाल्यास, भीम आर्मीच्या वतीने उपविभागीय कार्यालय, निलंगा समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर भीम आर्मीच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असल्याने आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
वनविभागातील हा भ्रष्टाचार प्रशासन साफ करणार का, की प्रकरण पुन्हा फाईलपुरतेच मर्यादित राहणार, हा प्रश्न आता जनतेतून उपस्थित होत आहे.