लातूर, दि. २२
समतेचा, करुणेचा आणि प्रज्ञेचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांच्या धम्माचा विराट जयघोष लातूर जिल्ह्यात घुमणार आहे. बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व सर्व उपासक-उपासिकांच्या संयुक्त विद्यमाने, भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आठवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद गुरुवार दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी महाविहार, धम्म संस्कार केंद्र, सातकर्णी नगर, रामेगाव (ता. जि. लातूर) येथे भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार आहे. परिषदेच्या जय्यत तयारीने परिसर धम्ममय झाला आहे.
परिषदेच्या भव्य सभामंडपाचे रोपन उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबराव नरवाडे, उपअभियंता इंजि. संजय सावंत व सरपंच साधना पांडुरंग मगर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
धम्माचा भव्य प्रारंभ :
गुरुवार, दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता डॉ. आंबेडकर चौक, लातूर येथे पंचरंगी धम्म ध्वजारोहणानंतर बुद्धमूर्तींसह पूज्य भिक्खू संघ व हजारो उपासक-उपासिकांची ऐतिहासिक धम्म मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मुख्य ध्वजारोहणानंतर महाविहार, सातकर्णी नगर येथे समारोपास येणार आहे.
परिषदेचे उद्घाटन व मान्यवरांची उपस्थिती :
दुसऱ्या सत्रात अखिल भारतीय भिक्खू संघ (बुद्धगया) चे संघनायक पू. भिक्खू करुणानंद महाथेरो (दिल्ली) यांच्या हस्ते परिषदेचे भव्य उद्घाटन होणार असून, भिक्खू धम्मसेवक महाथेरो अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी सातकर्णी स्मरणिकेचे विमोचन महाबोधी सोसायटीचे जनरल सेक्रेटरी पू. भिक्खू शिवली महाथेरो (श्रीलंका) यांच्या हस्ते होणार आहे.
या धम्ममहोत्सवात प्रख्यात सिनेअभिनेते गगन मलिक, माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख, माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे, आमदार रमेशप्पा कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर (घुगे), जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
धम्मदेशना व सांस्कृतिक पर्व :
देश-विदेशातून आलेले पूज्य भिक्खू भ. शरणानंद महाथेरो, भ. प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो, भ. डॉ. यशकाश्यपायन महाथेरो, भ. धम्मानंद, भ. दयानंद, भ. धर्मपाल, भ. ज्ञानसागर, भ. नागसेनबोधी, भ. संघपाल, भ. धम्मसार, भ. शाक्यपुत्र राहूल, भ. बोधीधम्मा थेरो आदी समता, करुणा व मानवमूल्यांवर मार्गदर्शक धम्मदेशना देणार आहेत. सायंकाळी महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक विकास राजा (नागपूर) यांचा बुद्ध–भीम गीतांचा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे.
हजारोंनी सहभागी व्हा – धम्माचा इतिहास घडवा :
या ऐतिहासिक धम्म परिषदेचा लाभ घेण्यासाठी लातूर शहर व जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक-उपासिकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक भिक्खू पय्यानंद थेरो यांनी केले आहे.
