लातूरमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचितची संवाद बैठक
महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्याचा ठाम निर्णय
लातूर,दि.२५ (मिलिंद कांबळे)
नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर वंचित बहुजन आघाडीने लातूर महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. याच अनुषंगाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत लातूर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संवाद बैठक पार पडली.
या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी संघटन मजबूत करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. प्रत्येक प्रभागात काम वाढवा, मतदारांशी थेट संपर्क ठेवा आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्या, असे निर्देश ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले. नगरपरिषद निवडणुकीतील यश ही केवळ सुरुवात असून महानगरपालिकेतील सत्ता ही पुढची लढाई असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत लातूर शहरातील पाणीपुरवठा, खराब रस्ते, आरोग्य व्यवस्था, शिक्षण आणि स्वच्छतेसारख्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, सामान्य व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच ठामपणे रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देण्यात आला.
या बैठकीस वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य सदस्य अमोल लांडगे, जिल्हा निरीक्षक शुद्धोधन सावंत, जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर, महासचिव रमेश गायकवाड, रोहित सोमवंशी, नितीन गायकवाड, रमेश माने, सचिन गायकवाड, आकाश इंगळे, सुजाता अजनिकर यांच्यासह शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
