निलंगा,दि.२७
“शाळा म्हणजे फक्त वर्गातील फळा नाही, तर आयुष्य शिकवणारी प्रयोगशाळा आहे” हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, जेव्हा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, बडूर येथील इयत्ता दुसरी ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर लीज ओंकार साखर कारखाना, अंबुलगा येथे शैक्षणिक भेट दिली.
ज्यांनी आजवर फक्त पुस्तकात पाहिलेली साखरनिर्मितीची प्रक्रिया, त्या चिमुकल्या डोळ्यांनी उसापासून साखर तयार होण्याचा प्रत्यक्ष प्रवास अनुभवला. कारखान्यातील भल्या मोठ्या यंत्रांची गर्जना, बॉयलरमधून उसाच्या रसाचा उष्ण प्रवाह, आकाशाला भिडणारी चिमणी, ज्युस विभाग, पॅकिंग विभाग व गोडाऊन हे सारे पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे कुतूहल, आनंद आणि आश्चर्य शब्दात न मावणारे होते. शेवटी प्रत्यक्ष तयार झालेल्या साखरेचा गोडवा चाखताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्यच या भेटीचे यश सांगून जात होते.
यानंतर निसर्ग शाळा या उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने विकसित केलेल्या लांबोटा उद्यानात ही सहल पोहोचली. हिरवाईच्या सान्निध्यात स्नेहभोजनाचा आनंद घेताना विद्यार्थ्यांना निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी मिळाली. केळी व जिलेबीचा गोड आस्वाद घेतल्यानंतर घसरगुंडी, झोके व बालउद्यानातील खेळणी यामध्ये रमलेली ती हसरी चेहरे क्षणभरही थांबत नव्हती.
या आनंदमयी प्रवासात सामाजिक भान जपताना गोविंद बापू सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण होऊ नये म्हणून शंभर टक्के विद्यार्थ्यांना सनरिच कंपनीच्या पाण्याच्या बाटल्या वाटप करून माणुसकीचा सुंदर आदर्श घालून दिला.
ही सहल म्हणजे केवळ एक भेट नव्हती, तर चिमुकल्यांच्या मनात स्वप्नांची बीजे पेरणारा अनुभव होता. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक बळवंत सरवडे, तसेच मंदाकिनी माकणे मॅडम, गजानन मोरे सर, हनुमंत गुंड सर यांनी घेतलेले परिश्रम विद्यार्थ्यांच्या आनंदी चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते.