लातूर,दि.२७(मिलिंद कांबळे)
करुणा, मैत्री,अहिंसा आणि समतेवर आधारित तथागत गौतम बुद्धांचा धम्म हा केवळ धार्मिक उपदेश नसून तो संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा शाश्वत मार्ग आहे. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” आणि “भवतु सब्ब मंगल” हा विश्वकल्याणाचा महामार्ग बुद्धांनी मानवजातीसमोर उघड केला. त्यामुळे तथागत बुद्धांचा विचार म्हणजेच मानवतेचा विचार असल्याचे ठाम प्रतिपादन अखिल भारतीय भिक्खु संघाचे संघनायक पूज्य भिक्खु करुणानंद महाथेरो (दिल्ली) यांनी केले.
बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व समस्त बौद्ध उपासक-उपासिकांच्या वतीने, डॉ. भिक्खु उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भिक्खु पय्यानंद थेरो यांच्या संयोजनात, महाविहार धम्म संस्कार केंद्र, बार्शी रोड, सातकर्णी नगर, रामेगाव (ता. जि. लातूर) येथे एकदिवसीय आठवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद प्रचंड उत्साहात पार पडली.
परिषदेच्या सकाळच्या सत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व बौद्ध नगर येथून पंचरंगी ध्वज फडकवत भिक्खु संघ व बौद्ध उपासक-
उपासिकांची भव्य धम्म मिरवणूक काढण्यात आली.
ही मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे समारोपास आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण व पंचशील वंदना घेण्यात आली. भिक्खु पय्याबोधी थेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
दुपारच्या उद्घाटन सत्रात पूज्य भिक्खु करुणानंद महाथेरो यांच्या हस्ते परिषदेचे भव्य उद्घाटन करण्यात आले. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या बौद्ध जनसमुदायाने धम्मघोषात परिसर दुमदुमून टाकला. यावेळी ‘सातकर्णी’ स्मरणिकेसह आर्या मेत्ता तसेच डॉ. मा. ना. गायकवाड यांच्या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.
परिषदेस विशेष अतिथी म्हणून प्रख्यात सिनेअभिनेते गगन मलिक, माजी मंत्री आ. अमित देशमुख व माजी मंत्री आ. संजय बनसोडे उपस्थित होते.
यावेळी गगन मलिक म्हणाले, की,“बौद्ध धम्माचा प्रचार केवळ भाषणांपुरता न ठेवता आचरणातून झाला पाहिजे. बौद्ध अनुयायांनी एकजुटीने धम्म प्रसारासाठी कार्यरत राहणे गरजेचे आहे.”
माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत, महाविहार धम्म संस्कार केंद्रास येत्या काळात तीर्थक्षेत्र विकासाचा ‘ब’ दर्जा व विकास निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
माजी मंत्री आ. अमित देशमुख म्हणाले, “बौद्ध धम्म हा भारताचा मूळ आत्मा आहे. गौतम बुद्धांमुळे भारताची ओळख जगभर पोहोचली. पानगावचे चैत्य स्मारक आणि सातकर्णी नगरचे महाविहार ही लातूर जिल्ह्याची वैचारिक ओळख असून, येथे भविष्यात बौद्ध धम्माची भव्य ‘बुद्धसृष्टी’ साकारली जाईल.”
यावेळी श्रीलंकेचे माजी खासदार भिक्खु अतुरलीये रतन महाथेरो, डॉ. खेमधम्मो महाथेरो, प्राचार्य सत्यपाल महाथेरो, डॉ. इंदवंस महाथेरो यांच्यासह अनेक भिक्खुंनी रात्री उशिरापर्यंत प्रभावी धम्मदेशना दिल्या.
धम्मदेशनेनंतर प्रसिद्ध गायक विकास राजा (नागपूर) यांच्या बुद्ध–भीम गीतांच्या प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित जनसमुदाय भारावून गेला.
परिषदेचे प्रास्ताविक केशव कांबळे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. देवदत्त सावंत यांनी केले. परिषद यशस्वी करण्यासाठी धम्मसेवक ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.