स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित प्रशासनाचे मौन धोकादायक..
निलंगा,दि.२८
मौजे केळगाव ता. निलंगा जिल्हा लातूर येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असतानाही प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. उपविभागीय अधिकारी, निलंगा यांच्या मार्फत दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी प्रस्ताव पाठवण्यात आला असतानाही उपजिल्हाधिकारी कार्यालयाने अद्याप निर्णय न घेतल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या आठवड्यात बौद्ध समाजातील दोन व्यक्तींचे निधन झाले. मात्र दफन करताना नव्याने खोदकाम केल्यावर पूर्वी दफन केलेल्या मृतदेहांचे हाडांचे अवशेष बाहेर निघाले. ही घटना केवळ अमानवी नसून मृत्यूनंतरही बौद्ध समाजाची सुरू असलेली अवहेलना असल्याचा संतप्त आरोप नागरिकांतून होत आहे.
दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी लेखी तक्रार देऊनही प्रशासन गप्प बसल्याने “बौद्ध समाज माणूस नाही का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. मृताला सन्मानाने दफन करण्याचा अधिकारही जर नाकारला जात असेल, तर संविधानिक मूल्यांचा अर्थ काय, असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास केळगावमध्ये तीव्र सामाजिक उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा बौद्ध समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत प्रशासन काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…