ॲड. वैशालीताई डोळस
निलंगा,दि.२९(मिलिंद कांबळे)
देशात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा राजकीय बाजार मांडणाऱ्या भाजपा व काँग्रेसचा आंबेडकरवाद हा केवळ मुखवटा असून तो पूर्णतः बेगडी, तकलादू आणि फसवा आहे, असा घणाघाती आरोप ॲड. वैशालीताई डोळस यांनी निलंग्यात केला. लातूर जिल्ह्यातील पहिली स्त्री मुक्ती परिषद व मनुस्मृती दहन दिन छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे प्रचंड उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमातून सत्ताधारी-विरोधक दोघांनाही थेट वैचारिक आव्हान देण्यात आले.
“छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाने तलवारीने अन्याय मोडून काढला, तर दुसऱ्याने संविधानाच्या लेखणीने गुलामगिरी उद्ध्वस्त केली,”असेही डोळस म्हणल्या
त्या पुढे म्हणाल्या की,इतिहासाची तोडमोड करणाऱ्या राजकीय शक्तींना जोरदार झटका दिला.
मनुस्मृतीवर बोलताना त्या म्हणाल्या, मनुस्मृती ही केवळ एका धर्माची नव्हे, तर सर्व धर्मातील महिलांना गुलाम बनवणारी मानसिकता आहे. स्त्रीला दुय्यम ठरवणाऱ्या या विचारधारेविरोधात महिलांनी आता गप्प बसू नये, तर रस्त्यावर उतरून संघर्ष उभारला पाहिजे, असा थेट इशारा त्यांनी दिला.
“समाजकारणात महिलांना केवळ शोभेची बाहुली बनवले जाते. हे थांबले पाहिजे. नवी पिढी घडवायची असेल तर महिलांनी नेतृत्व हाती घेतलेच पाहिजे,” असे ठणकावून सांगत त्यांनी स्त्रीशक्तीला जागं केलं.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक सौ.मंजू निंबाळकर यांनी केले. यावेळी सौ. विमलताई आकानगिरे यांनी अत्यंत आक्रमक व वास्तववादी भाषण करत स्त्री मुक्ती चळवळीची दिशा स्पष्ट केली.
व्यासपीठावर सौ. सुनीता लोकरे, सौ. मंगलताई मंडाले, नीता कांबळे, डॉ. हिरालाल निंबाळकर उपस्थित होते. भीमकोरेगाव विजयस्तंभाची प्रेरणा घेऊन निलंगा तालुक्यात समता सैनिक दल अधिक मजबूत करण्यासाठी जे काही लागेल ते केले जाईल, अशी ठाम घोषणा यावेळी करण्यात आली.
परिषदेला सौ. पुष्पा कांबळे, देवदत्त मच्छिंद्र सूर्यवंशी यांच्यासह निलंगा, औराद, देवणी, कासारशिरसी परिसरातील महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही परिषद केवळ कार्यक्रम न राहता मनुवादी व्यवस्थेविरोधात उभारलेलं वैचारिक रणशिंग ठरली, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.