भारतीय रस्सीखेच संघाच्या कर्णधाराचा जि.प. शाळेत गौरव
निलंगा,दि.३०
महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवर वसलेल्या बडूर या दुर्गम गावच्या भूमिकन्येने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करत देशाचा तिरंगा सातासमुद्रापार फडकावला आहे. भारतीय रस्सीखेच संघाच्या कर्णधार मा. रूपाली विठ्ठल बोधे यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, बडूर येथे त्यांचा गौरव करण्यात आला.
ऑक्टोबर २०२५ मध्ये मलेशिया येथे पार पडलेल्या १५व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये रस्सीखेच (टग ऑफ वॉर) या खेळात रूपाली बोधे यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चौथा क्रमांक मिळवून देशाच्या क्रीडाक्षेत्रात मान वाढवला. या यशानंतर त्या आपल्या मूळ गावी आल्याने जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सोसायटी बडूर व प्रदीप जयशेट्टे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. सत्काराला उत्तर देताना रूपाली बोधे यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले. “लहानपणापासून ते कॉलेजपर्यंत आई-वडिलांनी दिलेल्या पाठबळामुळेच मी आज या टप्प्यापर्यंत पोहोचू शकले,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवलिंग हाबरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख माचेवाड, सरपंच गुंडाप्पा हासुरे, उपसरपंच खंडू काकडे, यांच्यासह कमलाकर वाघे, लक्ष्मण होळकर, धनराज जाधव, कुंडलिक राजे, प्रदीप जयशेट्टे, आकाश वाकडे, जगदीश चिंचोले उपस्थित होते.
यावेळी शाळेतील शिक्षक मंदाकिनी माकणे, धीरज पाटील, गजानन मोरे, हनुमंत गुंड तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तरुण उद्योजक विजय जयशेट्टे व राहुल जाधव यांनी मंडप, साउंड सिस्टीम व आवश्यक व्यवस्था केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंडलिक राजे यांनी केले, तर मुख्याध्यापक श्री. बळवंत सरवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.