डॉ. डी. एन. चिंते
लातूर,दि.०१
शिक्षण हेच जीवनातील खरी गुरुकिल्ली असून, विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा पूर्ण उपयोग करून यशाच्या शिखरांवर पोहोचावे, असे आवाहन प्रसिद्ध शल्यचिकित्सक व नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य डॉ. डी. एन. चिंते यांनी केले.
तुळजाभवानी शैक्षणिक संकुलाच्या ‘कलाविष्कार २०२५-२६’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे मंगळवारी दगडोजीराव देशमुख सभागृहात आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ. चिंते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, “पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळेच्या दारात धडपड करावी लागे; आज शाळा त्यांच्या दारात पोहोचली आहे. या संधीचा योग्य उपयोग करून यशस्वी भविष्य घडवा.”असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डी. एन. केंद्रे होते. उपस्थित मान्यवरांमध्ये पंचायत समितीचे नोडल प्रमुख संतोष सूर्यवंशी, संजय क्षीरसागर, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, बाळासाहेब पाटील, संकुलाचे सचिव के. ए. जायेभाये, राजमाता जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे आणि शिक्षक उपस्थित होते.
प्राचार्य डी. एन. केंद्रे म्हणाले, “या संकुलातील शिक्षक ज्ञानदान केवळ कर्तव्य म्हणून नाही, तर पूर्ण समर्पण भावनेतून करतात. शाळेतून निघताना ते घड्याळाकडे पाहत नाहीत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा आमचा प्राथमिक उद्देश आहे.” त्यांनी यावेळी सांगितले की, येथील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकत आहेत आणि लातूर जिल्ह्यातील पहिली ‘एआय’ कार्यशाळा या संकुलात होईल.
इंडियन टॅलेंट ऑलंपियाडमध्ये बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड मिळाल्याबद्दल प्राचार्य संगमेश्वर केंद्रे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे यांनी पीपीटीद्वारे संकुलाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा उंच आलेख सादर केला. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा – टप्पा १’ स्पर्धेत तुळजाभवानी विद्यालयाने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून, दहावीचा निकाल सातत्याने शंभर टक्के येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
संमेलनात विद्यार्थ्यांनी समूह नृत्य, गायन, वक्तृत्व, वादविवाद, कथा-कथन, एकपात्री अभिनय सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलोक पाचेगावकर यांनी केले. पालक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.