निलंगा,दि.०१
मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगत्या इतिहासाचे साक्षीदार आणि निलंगा तालुक्यातील एकोजी मुदगड येथील थोर स्वातंत्र्यसैनिक मधुकरराव वामनराव पाटील यांचे गुरुवारी (दि. १ जानेवारी) दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय १०२ वर्षे होते. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका देदिप्यमान पर्वाचा अंत झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
कै. मधुकरराव पाटील यांनी तरुणपणात निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्ध मराठवाडा मुक्ती संग्रामात मोलाचे योगदान दिले होते. स्वातंत्र्यसेनानी मोहनराव पाटील हाडोळीकर, हणमंतराव माडजकर आणि शेषरावजी वाघमारे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली त्यांनी निजामाविरुद्ध मोठी झुंज दिली होती. भूमिगत राहून आणि प्रत्यक्ष रणधुमाळीत सहभागी होऊन त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये हिरीरीने भाग घेतला होता.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच निलंगा तालुक्यासह जिल्हाभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी त्यांच्या मूळ गावी, एकोजी मुदगड येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महान क्रांतिकारकाला अखेरची मानवंदना दिली.
कै.मधुकरराव पाटील हे शिस्तप्रिय आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात पाच मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. एकोजी मुदगड येथील पोलीस पाटील नंदकिशोर पाटील हे त्यांचे सुपुत्र होत.
स्वातंत्र्यलढ्यातील हा ‘शतायुषी योद्धा’ आपल्या कार्यातून आणि विचारांतून भावी पिढीसाठी सदैव प्रेरणादायी राहील, अशा शब्दांत सर्वत्र श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.