तळेगाव (प्रतिनिधी)
तळेगाव नगरीत आयोजित मुस्लिम बांधवांच्या ‘तब्लिगी इज्तिमा’ या धार्मिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नेते मारोतराव कवळे गुरुजी यांनी आज कार्यक्रमस्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आयोजकांशी संवाद साधून सोयी-सुविधांबाबत सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान मारोतराव कवळे गुरुजी यांनी प्रत्यक्ष इज्तिमाच्या जागेची पाहणी केली. “कार्यक्रमाच्या नियोजनात कोणतीही कमतरता भासल्यास निसंकोचपणे सांगा, सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,” असे आश्वासन त्यांनी यावेळी आयोजकांना दिले. तसेच, कार्यक्रमादरम्यान सुरक्षा व्यवस्था चोख राहावी आणि पोलीस यंत्रणा सतर्क असावी, या संदर्भात त्यांनी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांशी विचार-विनिमय करून आवश्यक सूचना दिल्या.
याप्रसंगी मारोतराव कवळे गुरुजी यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष संजयजी कुलकर्णी, भाजप जिल्हाध्यक्ष बापूसाहेब पाटील कौडगावकर, माजी नगराध्यक्ष सुभाषजी पेरेवार, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील ढगे, मोहम्मद खाजासेट, मोगल बेग तळेगावकर (ग्रामपंचायत सदस्य) यांसह परिसरातील अनेक मान्यवर आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तळेगाव येथील या धार्मिक कार्यक्रमासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व सहकार्य मिळवून देण्याचा शब्द यावेळी नेत्यांनी दिला, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.