निलंगा,दि. ०३
ज्या समाजाने स्त्रीला शिक्षणापासून दूर ठेवण्यासाठी अपमान, दगडधोंडे व मानसिक छळ केला, त्याच समाजाला शिक्षणाची दिशा दाखवणाऱ्या, अंधश्रद्धा व मनुवादी मानसिकतेविरुद्ध आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महाराष्ट्र प्राथमिक विद्यामंदिर, निलंगा येथे केवळ औपचारिकता न ठेवता ठाम वैचारिक भूमिकेतून साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक मलीले सर यांनी भूषविले. अध्यक्ष म्हणून सौ. नाईकवाडे मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक मनियार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी बोलताना शाळेचे शिक्षक पवळे सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करत स्पष्ट शब्दांत सांगितले की, आज २१ व्या शतकातही मुलींच्या शिक्षणावर सामाजिक बंधने, रूढी व अडथळे लादले जात आहेत. अशा परिस्थितीत सावित्रीबाईंचे विचार केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष कृतीत उतरवणे ही काळाची गरज आहे.
“जयंती म्हणजे केवळ फोटोपूजन नव्हे, तर अन्यायकारक सामाजिक व्यवस्थेविरुद्ध उभे राहण्याचा आणि समतेच्या विचारांची मशाल पेटवण्याचा ठाम निर्धार आहे,” असे ठाम मत यावेळी मांडण्यात आले.
कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांसमोर सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष, त्याग, अपमान सहन करूनही अखंड पेटवत ठेवलेला शिक्षणाचा दिवा आणि स्त्री शिक्षणासाठी दिलेले बलिदान प्रभावीपणे मांडण्यात आले.
विशेष बाब म्हणजे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी सावित्री मातेच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. त्यामुळे कार्यक्रमाला केवळ देखाव्यापुरते स्वरूप न राहता ठोस वैचारिक धार प्राप्त झाली. लहान वयातच समता, शिक्षण आणि संघर्षाचे संस्कार रुजवणारा हा कार्यक्रम ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पवळे सर व मरगणे मॅडम यांनी प्रभावीपणे केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, विचारप्रधान व समाजाला आरसा दाखवणारा ठरला. हा कार्यक्रम म्हणजे केवळ एक जयंती नव्हे, तर आजच्या व्यवस्था व समाजाला दिलेला ठाम वैचारिक इशारा ठरला.