निलंगा,दि.१२
जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याची तेजस्वी संकल्पना जन्माला आली आणि ज्या मातृसंस्कारांतून छत्रपती शिवाजी महाराज घडले, त्या राजमाता जिजाऊ आईसाहेब तसेच “उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका” असा राष्ट्रउद्धाराचा अमर मंत्र देणारे स्वामी विवेकानंद यांची जयंती शिवाजी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, केळगाव (तांडा) येथे अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पासमे सर व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक बैकरे सर यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले.
यावेळी मार्गदर्शन करताना पासमे सर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारशाळेतून घडलेले शिवराय आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी जागृत झालेली तरुणाई यांचे उदाहरण देत विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती, आत्मसन्मान व संघर्षाची प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता राष्ट्रनिर्मितीसाठी सज्ज झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख चिकुर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे, देशभक्तीपर नृत्ये व विचारप्रवर्तक नाटिका सादर करून कार्यक्रमाला वैचारिक उंची दिली.
या प्रेरणादायी कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.