लातूर, दि.२४
समाजात बोकाळलेली अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, प्रथा आणि चालीरीतींच्या विरोधात विवेकी विचारांचे रणसिंग फुंकण्याची आज नितांत गरज आहे, असे ठाम प्रतिपादन सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अँड. रंजना पगार गवांदे (संगमनेर) यांनी केले.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात आयोजित महात्मा बसवेश्वर व्याख्यानमालेच्या समारोप व तिसऱ्या पुष्पाच्या प्रसंगी “समाज वास्तवाला भिडताना” या विषयावर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर होते.
यावेळी अँड. पगार गवांदे म्हणाल्या की, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही समाजात कर्मकांड, चेटूक, डाकिन, अघोरी उपाय करणारे भोंदू बाबा, मांत्रिक-तांत्रिक मोठ्या प्रमाणावर समाजाची दिशाभूल करत आहेत. अंधश्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण थांबवण्यासाठी कठोर भूमिका घेतली पाहिजे आणि अशा भोंदू बाबांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
स्त्रीभ्रूणहत्या, कौमार्य चाचणी, चारित्र्य परीक्षा, देवदासी प्रथा, बालविवाह यांसारख्या अमानवी प्रथांचा विज्ञाननिष्ठ समाजाने ठामपणे विरोध करून त्या कायमच्या उखडून फेकल्या पाहिजेत. तसेच जातपंचायतींच्या जोखडात अडकलेल्या कुटुंबांना या अन्यायकारक व्यवस्थेतून मुक्त केले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तथागत गौतम बुद्ध, महात्मा बसवण्णा आणि महाराष्ट्रातील संत-सुधारकांनी अंधश्रद्धा व सामाजिक अन्यायाविरोधात दिलेला लढा आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोपात माधवराव पाटील टाकळीकर म्हणाले की, महात्मा बसवण्णा हे क्रांतिकारी समाजसुधारक होते. संघटित प्रयत्नांमधूनच त्यांच्या समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या आंतरराष्ट्रीय कल्पना साकार होऊ शकतात. आजच्या लोकशाही व्यवस्थेतही महात्मा बसवण्णांचे विचार, तत्त्वज्ञान आणि कार्य समाजउन्नतीसाठी अत्यंत मोलाचे आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रास्ताविक डॉ. रत्नाकर बेडगे, पाहुण्यांचा परिचय डॉ. अश्विनी रोडे, सूत्रसंचालन प्रा. किसनाथ कुडके यांनी केले तर आभार डॉ. मनोहर चपळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आनंद शेवाळे, मुख्य समन्वयक डॉ. नल्ला भास्कर रेड्डी, पर्यवेक्षक प्रा. नितीन वाणी, सहसंयोजक डॉ. सिद्राम डोंगरगे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या व्याख्यानमालेस शहरातील मान्यवर, अभ्यासक, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.