लातूर,दि.03(मिलिंद कांबळे)
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर(प) तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, लातूर च्या संयुक्त विद्यमाने धम्म चक्र अनुवर्तन दिनाच्या निमित्ताने भव्य धम्म दीक्षा सोहळ्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क,लातूर येथे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अधिकृत नोंदी करणाऱ्या १३५ नवदीक्षितांना भारतीय बौद्ध महासभेकडून प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
या धम्म दीक्षा सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षा आशाताई चिकटे होत्या. तसेच मंचावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर 134 व्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे स्वागत अध्यक्ष डॉ. विजय अजनीकर सह भारतीय बौद्ध महासभेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
बुद्ध, बाबासाहेब यांच्या प्रतिमांचे पूजन करुन त्रिसरण पंचशील देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या प्रास्ताविकातून जिल्हा उपाध्यक्ष गौतम बनसोडे यांनी उपस्थितांना बाबासाहेबांनी आपल्याला १९५६ साली धम्म दिला. त्यामुळे आपण जन्माने बौद्ध होत नाही त्यासाठी धम्माची विधिवत दीक्षा घ्यावी लागते, तरच आपण बौद्ध म्हणून गणले जाऊ, त्यामुळे येणाऱ्या पिढीने धम्म स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे सांगून उपस्थितांना येणाऱ्या काळात अधिकृतपणे धम्म स्वीकारून भारतीय बौद्ध महासभेचे प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन केले.
भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा हिशोब तपासणी राजाभाऊ उबाळे यांनी उपस्थितांना बाबासाहेबांनी सांगितलेल्या बावीस प्रतिज्ञा दिल्या. बौद्धाचार्य डी. पी. भोसले व लक्ष्मण कांबळे, वाल्मीक कांबळे रवींद्र राजेगावकर यांनी रीतसर धम्म दीक्षा दिली. लातूर शहरातील व परिसरातील उपासिक- उपसिकांनी धम्माचा स्वीकार केला. यात एकूण १३५ जणांनी अधिकृतपणे धम्माचा स्वीकार केला. या धम्मदीक्षेला महिला व पुरुषांचा सम प्रमाणात सहभाग होता.
धम्म दीक्षा समितीचे जिल्हा प्रमुख राहुल गायकवाड यांनी नवदीक्षितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचे पालन ठाम निश्चयाने करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, पंचशीलाचे पालन तीन अंगानी करावे, काया, वाचा व मनाने कोणतेही अकुशल कर्म करू नये. तसेच उपोसथाबाबत सविस्तर माहिती देऊन त्याचे महत्व सांगितले.
अध्यक्षीय समारोप आशाताई चिकटे यांनी उपस्थितांना धम्म आचरणाचे महत्व पटवून देऊन केला. धम्माचे आचरण करुन आपले भावी आयुष्य सुखकर करण्याचा संदेश दिला. सुशीलकुमार चिकटे यांनी नवदीक्षितांचे स्वागत करुन त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रमाणपत्राचे वाटप आशाताई चिकटे व सुशीलकुमार चिकटे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर व डिव्हिजन ऑफिसर विलास आल्टे यांनी केले. आभार अर्जून कांबळे सरांनी मानले. याप्रसंगी सरणत्तयने या धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.