
लातूर,दि.०४(मिलिंद कांबळे)
ओढ्या काठच्या जमीनीत पुराचे पाणी शिरुन संपूर्ण खरीप हंगामातील पिकाची नासाडी झाल्याने आर्थिक विवंचनेतून तालुक्यातील हाडगा येथील शेतकरी मधूकर सोपान वाघमारे या शेतकऱ्याने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना शनिवार (दि ४) रोजी सकाळी नऊ वाजता घडली.
निलंगा तालुक्यातील हाडगा येथील अल्पभूधारक शेतकरी मधूकर सोपान वाघमारे वय ६५ वर्ष यांची गावच्या शेजारीच ओढ्याच्या काठावर जमीन असून मागच्या एक महिन्यापासून सततच्या मुसळधार पावसाने त्यांच्या शेतात पाणी शिरुन खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. लागवडीचा खर्चही निघणार नसल्याने आर्थिक विवंचनेत ते मागच्या आठ दिवसापासून बेचैन झाले होते.
त्यातच त्यांनी शनिवारी सकाळी नऊ वाजता स्वतःच्या घरात विष प्राशन केले. तात्काळ त्यांना निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली होती. शवविच्छेदनानंतर सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. घटनेची माहिती तंटामुक्ती अध्यक्ष धनाजी वाघमारे यांनी महसूल व पोलीस प्रशासनाला दिली.
याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तर सदरील मयताच्या कुटुंबाला सरकारच्या वतीने नियमानुसार आर्थिक मदत मिळवून देऊ असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले…