कासार सिरसी : ( बालाजी मिलगीरे)
औसा मतदारसंघात नव्याने आकार घेत असलेल्या कासार सिरसी पंचायत समिती निवडणुकीकडे सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत स्थानिक सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केलेले युवा नेते अजहर मुजावर (सावकार) यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
मुजावर यांच्या उमेदवारीला स्थानिक तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या प्रवेशामुळे पंचायत समितीची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, प्रत्येक गावात राजकीय हालचालींना जोर आला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातील कासार सिरसी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे.
या निवडणुकीत कासार सिरसी जिल्हा परिषद गण सर्वसाधारण पुरुषासाठी, तर पंचायत समिती गण ओबीसी पुरुषासाठी आरक्षित असल्याने, या दोन्ही प्रवर्गांतील कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे.
प्रत्येक पक्ष आपापल्या गोटातील कार्यकर्त्यांची कामगिरी, सामाजिक स्वीकार्यता आणि जनसंपर्क यांचा बारकाईने अभ्यास करत आहे.
ठाकरे गटाकडून उमेदवारीचा शिक्का
या पार्श्वभूमीवर, मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अझहर जवाद मुजावर यांच्या नावावर उमेदवारीचा शिक्का लागल्याची अधिकृत चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
मुजावर यांनी स्वतः या बातमीला दुजोरा देताना सांगितले की, “गेल्या दहा वर्षांपासून मी कासार सिरसी व परिसरातील जनतेच्या सेवेत काम करत आहे. युवकांना संघटित करून, सामाजिक कार्याद्वारे विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. जनतेचा विश्वास आणि पक्षाचा आशीर्वाद मिळाल्यास माझ्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटेन,” असे त्यांनी सांगितले.
दहा वर्षांची सामाजिक वाटचाल
अझहर मुजावर यांची सामाजिक वाटचाल प्रेरणादायी ठरली आहे.
मागील दशकभर त्यांनी कोणत्याही पदाचा मोह न ठेवता निराधारांना आधार देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य, रक्तदान शिबिरांचे आयोजन, आरोग्य शिबिरे, अनाथाश्रमांना मदत, आणि शेतकरी व वंचित घटकांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे अशी अनेक कार्ये केली आहेत. त्यांनी १५ ते २० लाख रुपयांचे विकासकामे कोणत्याही पदावर नसताना स्वतःच्या पुढाकाराने केली आहेत. यामध्ये रस्त्यांची बांधणी, पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती, आणि अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे उल्लेखनीय आहेत.
त्यांच्या या निस्वार्थ कामगिरीमुळे कासार सिरसी परिसरात त्यांचा जनसंपर्क, लोकाधार आणि विश्वासार्हता वाढली आहे. आज त्या भागातील प्रत्येक गावात त्यांचे नाव प्रामाणिकपणे घेतले जाते.
वरिष्ठ नेत्यांचे आशीर्वाद
अझहर मुजावर हे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार मा. ओमराजे निंबाळकर यांचे निकटवर्तीय असून, लातूर जिल्हा परिषदचे माजी कृषी सभापती बजरंग (दादा )जाधव यांचे विशेष विश्वासू मानले जातात.
या दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समाजकारण, संघटन आणि जनतेशी संवाद या क्षेत्रांत अनुभव मिळवला आहे. त्यांच्या सहवासामुळे मुजावर यांनी प्रशासनाशी संवाद साधण्याची कौशल्ये आत्मसात केली असून, त्याचा उपयोग आता ते लोकहिताच्या कामासाठी करत आहेत.
युवकांमध्ये लोकप्रिय चेहरा
कासार सिरसी परिसरातील युवक वर्गात अझहर मुजावर हे लोकप्रिय चेहरा बनले आहेत. त्यांनी बेरोजगार युवकांना स्वावलंबनाच्या दिशेने प्रेरित करण्यासाठी ‘युवा प्रेरणा अभियान’ चालवले. तसेच, परिसरातील क्रीडा संघटनांना आर्थिक सहाय्य देऊन ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ दिले.
त्यांनी “राजकारण हे सत्तेसाठी नव्हे तर सेवेचे माध्यम आहे” हा संदेश तरुणांना दिल्याने त्यांचा प्रभाव राजकीय सीमांच्या पलीकडे गेला आहे.
सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश
मुजावर यांनी धर्म, जात आणि पक्षीय भेद बाजूला ठेवून सामाजिक एकात्मतेचा धागा मजबूत केला आहे.
ग्रामपातळीवर झालेल्या अनेक वादांमध्ये मध्यस्थी करून त्यांनी शांतता, सलोखा आणि विकासाचा मार्ग दाखवला आहे. त्यांनी महापुरुषांच्या जयंती, रमजान, गणेशोत्सव, दिवाळी, होळी अशा सर्व सण-उत्सवांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहतो. त्यामुळे त्यांना “जनतेचा नेता” म्हणून ओळख मिळाली आहे.
आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष कासार सिरसीची ही निवडणूक राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जात आहे. या गणात ठाकरे गट, राष्ट्रवादी (शरद पवार गट), भाजप आणि काँग्रेस अशा चारही प्रमुख पक्षांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
अझहर मुजावर यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाची ताकद वाढली असून, त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांमध्येही हालचाल सुरू झाली आहे.
मुजावर यांचा प्रामाणिकपणा, कार्यकुशलता आणि जनतेशी थेट संवाद यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे, अशी चर्चा स्थानिक स्तरावर होत आहे.
राजकारणात नवीन असले तरी सामाजिक क्षेत्रात दशकभराची कामगिरी असलेले अझहर जवाद मुजावर हे कासार सिरसी पंचायत समिती निवडणुकीत एक मजबूत आणि जनतेचा प्रतिनिधी म्हणून उदयास येत आहेत.
त्यांचा उत्साही, प्रामाणिक आणि लोकाभिमुख दृष्टिकोन लक्षात घेता, कासार सिरसी मतदारसंघातील ही निवडणूक राजकीय शिस्त, तरुण नेतृत्व आणि विकासाच्या दृष्टीने आदर्श ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.