शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले..
हिंगोली, दि. ९
वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्ह्याचे प्रवक्ते तसेच समाजातील प्रेरणादायी मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व प्राचार्य डॉ. ॲड. मो. रफी शेख (जवळा बाजार) यांचे काल रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वंचित बहुजन आघाडी तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राने एक विद्वान आणि तळमळीचा कार्यकर्ता गमावला आहे.
श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बांधणीसाठी व समाजजागृतीसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. डॉ. शेख हे फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथील माजी विद्यार्थी होते. त्यांनी दुहेरी पीएच.डी. प्राप्त करून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले.
ते कला, साहित्य, संगीत, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातही सक्रिय होते. त्यांनी सम्यक विद्यार्थी आंदोलन या माध्यमातून अनेक तरुणांना बौद्ध आणि मानवतावादी विचारसरणीशी जोडले.
त्यांच्या निधनाने हिंगोली जिल्ह्यात शोककळा पसरली असून, विविध सामाजिक आणि राजकीय वर्तुळांतून श्रद्धांजली वाहिली जात आहे.