लातूर, दि.२५
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकृत झाले त्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर (प.) तर्फे भव्य “संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. संविधानातील लोकशाही मूल्ये, समानता, सामाजिक न्याय आणि बंधुता यांचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचावा या हेतूने ही रॅली आयोजित करण्यात येत असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
ही रॅली 26 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 4.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लातूर येथून सुरू होणार आहे. शहर व परिसरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, युवक, सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आशाताई चिकटे व सरचिटणीस अभिमन्यू लामतुरे यांनी संयुक्त निवेदनातून केले.
भारतीय संविधान हे जगातील सर्वांत प्रगत, समताधिष्ठित आणि मानवतावादी तत्त्वांनी सजलेले दस्तऐवज असल्याचे सांगताना महासभेने नमूद केले की, सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्यासाठी लोकांनी संविधानातील मूल्ये जाणून घेणे आवश्यक आहे.
समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही चार मूलभूत मूल्ये प्रत्येक नागरिकात दृढ होण्यासाठी अशा उपक्रमांची सतत गरज असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
भारतीय संविधान स्वीकारण्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील मसूदा समितीचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे सांगत महासभेने त्यांना सन्मानपूर्वक अभिवादन केले.
“वंचित, शोषित घटकांचे हक्क अबाधित राहावेत हा संविधानाचा आत्मा आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने संविधान वाचावे, समजून घ्यावे आणि आचरणात आणावे,” असे आवाहन संस्थेने केले.
रॅलीदरम्यान संविधानाचे प्रास्ताविक वाचन, जनजागृती फलक, संविधानाची मूल्ये दर्शविणारे संदेश, तसेच सामाजिक ऐक्य व बंधुता यावर आधारित घोषवाक्ये देण्यात येणार आहेत. रॅलीत विद्यार्थी आणि युवकांची विशेष उपस्थिती अपेक्षित आहे.
लातूर शहराने नेहमीप्रमाणे या उपक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन संविधान दिनाच्या औचित्याला शोभा द्यावी, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.