लातूर,दि.२७
लातूर शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थेत आठवड्यातील दुसरी विनयभंगाची घटना समोर आली असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या छेडछाडीची घटना समोर आली होती. त्याच संस्थेच्या प्राथमिक विद्यालयातील लिपिकाने तब्बल दहा ते पंधरा अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी 55 वर्षीय दत्ता मार्तंड भूतमपल्ले या लिपिकावर विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पालकांनी शाळेत मोठी गर्दी करून संताप व्यक्त केला.
लातूरला शिक्षणाची पंढरी म्हणून राज्यभर मान मिळाला असतानाच सलग दोन विनयभंगाच्या घटनांनी शहराची प्रतिमा मलिन झाली आहे.
पालकांनी “शाळेतच मुली सुरक्षित नसतील तर विश्वास कुठे ठेवायचा?” असा सवाल उपस्थित केला आहे.
या घटनांमुळे शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कर्मचारी नेमणुकीपूर्वी योग्य पडताळणी होते का, विद्यार्थिनींवर देखरेख पुरेशी आहे का, अंतर्गत तक्रार समित्या कार्यरत आहेत का याबाबत पालकांनी शंका व्यक्त केली.
घटना समजताच परिसरातील नागरिक आणि पालकांनी शाळेच्या आवारात मोठी गर्दी केली. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी मध्यस्थी करत जमाव शांत केला.
शहरातील या मालिकावजा घटनांनी शिक्षणविश्वाची सुरक्षा उणीव स्पष्ट झाली आहे.
“लातूरची शिक्षणप्रतिष्ठा वाचवायची असेल तर आरोपींवर जलद, कडक आणि उदाहरण ठरेल अशी कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे..