विश्वसमता, मानवाधिकार आणि लोकशाही मूल्यांसाठी भारताचा जागतिक गौरव..
पॅरिस / नवी दिल्ली
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा आत्मा असलेल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना जागतिक व्यासपीठावर नवा सन्मान मिळाला आहे. संविधान दिनाच्या पवित्र निमित्ताने युनेस्कोच्या पॅरिस येथील भव्य मुख्यालयात महामानव डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दिमाखात अनावरण करण्यात आले. यामुळे भारतीय लोकतांत्रिक वारशाला आंतरराष्ट्रीय समाजात मिळालेल्या प्रतिष्ठेत मोठी भर पडली आहे.
युनेस्कोचे महासंचालक खालिद अल-इनाय यांच्या हस्ते अनावरण पार पडले. विशेष म्हणजे, युनेस्कोच्या प्रतिष्ठित मुख्यालय प्रांगणात उभा राहिलेला हा पुतळा डॉ. आंबेडकर यांच्या जागतिक योगदानाची अत्युच्च ओळख मानला जात आहे. कार्यक्रमास भारताचे युनेस्कोतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा, विविध देशांचे राजनैतिक अधिकारी, भारतीय समुदायाचे मान्यवर आणि युनेस्कोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लोकशाही, समता आणि सामाजिक न्यायाची जागतिक कबुली
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जागतिक उपयुक्तता अधोरेखित केली.
डॉ. आंबेडकर यांनी मांडलेली समता, बंधुता व सामाजिक न्यायाची तत्त्वे ही केवळ भारतापुरती मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीसाठी दिशा दाखवणारी आहेत, असे यावेळी वक्त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
भारतीय संविधान हे जगातील सर्वाधिक आधुनिक, प्रगत आणि मानवकेंद्री संविधान मानले जाते. त्यातील प्रत्येक कलमामागे डॉ. आंबेडकरांचे गाढ संशोधन, दृष्टी आणि लोकशाहीबद्दलची कटिबद्धता आहे. त्या अमर कार्याचे जागतिक स्तरावर झालेले हे अनावरण भारतीय संविधानाला मिळालेल्या सर्वोच्च आदराचे प्रतीक ठरले आहे.
संविधान दिनात भरलेला ‘जागतिक अभिमानाचा सोहळा’ संविधान दिनासारख्या महत्वाच्या दिवशी झालेल्या या अनावरणाने जगभरातील भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण निर्माण केला.
भारतीय प्रतिनिधी मंडळाने हा कार्यक्रम “संविधान आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना दिलेला जागतिक मानाचा मुजरा” असल्याचे म्हटले.
विशाल शर्मा यांनी यावेळी सांगितले की,
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धिक तेज, सामाजिक क्रांती आणि मानवतावादी दृष्टिकोनातून जगाला समतेचा मार्ग दाखवला. युनेस्कोसारख्या जागतिक संस्थेत त्यांचा पुतळा उभा राहणे ही भारतासाठी अतुलनीय गौरवाची बाब असून हा क्षण प्रत्येक भारतीयाने हृदयात जतन करावा.”
भारतीय समुदायात उत्साहाचे वातावरण
पॅरिससह संपूर्ण युरोपातील भारतीय समुदायाने या अनावरणाचे स्वागत उत्साहाने केले. अनेक भारतीय समुदाय संघटनांनी युनेस्को परिसरात आणि जगभरातील भारतीय दूतावासांमध्ये संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले.
डॉ. आंबेडकरांच्या मानवतावादी विचारांना मिळालेल्या जागतिक सन्मानामुळे सोशल मीडियावरदेखील भारतीयांनी अभिमान व्यक्त केला.
जगाला दिलेला भारताचा लोकशाही संदेश
डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे युनेस्कोमध्ये झालेले अनावरण म्हणजे लोकशाही, मानवाधिकार, सामाजिक न्याय आणि शिक्षण क्षेत्रात भारताने जगाला दिलेल्या योगदानाचा सन्मान आहे.
युनेस्कोच्या मुख्यालयातील हा पुतळा भविष्यातील पिढ्यांना “समतेची शिकवण” देणारा आणि मानवजातीसाठी समानतेच्या मार्गाची आठवण करून देणारा ठरेल.
भारतीयांसाठी ‘अपूर्व आणि ऐतिहासिक’ दिवस
भारताचे संविधान वजगात आदर्श ठरले आहे. त्याचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जागतिक गौरवापुढे भारतीय जनतेत अभिमानाची भावना ओसंडून वाहत आहे.
युनेस्कोच्या मुख्यालयात संविधान दिनी झालेल्या या अनावरणाने भारताने जगाला दिलेल्या मूल्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा भक्कम नोंद झाली आहे.