शेतकऱ्यांकडून कामाचे पैसे न दिल्याने महिलांचा आमरण उपोषणाचा इशारा..
प्रशासनाने त्वरित आणि कडक कारवाई करण्याची मागणी…
निलंगा, दि. 28
मौजे कोकळगाव ता. निलंगा येथील 12 महिला मजूर सरवडी येथील शेतकरी वरसूकेत मोतीराम मोहिते व अशोक मोतीराम मोहिते यांच्या शेतात दिवाळीपूर्वी सोयाबीन काढण्यासाठी गेल्या. ठराविक कामाचे पैसे ₹55,000 असताना महिलांना फक्त ₹5,000 इसारत दिली गेली असून उर्वरित ₹25,000 अद्यापही देण्यात आलेले नाहीत.
याबाबत पीडित महिलांनी पोलिस अधीक्षक लातूर यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की,
महिलांनी तीन महिन्यांपासून कामाचे पैसे मागितले, तरी शेतकऱ्यांनी त्यांचा उपहास, धमकी आणि अपमानास्पद वागणूक दिली. उलट म्हणाले, “इतर ठिकाणी हजारो रुपये देईन, पण तुम्हाला पैसे देणार नाही.” काही महिला विधवा असून, हातावर पोट आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत उन्हात अनथक मेहनत करावी लागली.
महिलांनी स्पष्ट केले की, कामाचे योग्य पैसे दिले नाहीत तर प्रशासनासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. स्थानिकांनी ही घटना अत्यंत गंभीर मानून प्रशासनाने तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या घटनेमुळे गरीब मजूर महिलांवर होणाऱ्या अन्यायाची तीव्रता उघड झाली आहे, आणि धनाढ्य शेतकऱ्यांकडून महिलांना मिळणारी अपमानास्पद वागणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने कठोर आणि तातडीची उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.