अब्बू, हे पॅड तुझे नाही म्हणून शाळेतील मुलं मला चिडवत आहेत… सहा वर्षांचा माझा मुलगा उबैद म्हणाला, तेव्हा मन थबकलं. प्रसंग छोटासा असला तरी विचार करायला भाग पाडणारा आहे. इतक्या लहान वयात समाजातील भेदभावाची बीजं कशी काय शिरतात, आणि त्याला जबाबदार कोण हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला.
माझा मुलगा उबेद मुजावर हा सहा वर्षाचा गावातील शाळेतमध्ये शिकतो. दिवाळीच्या सुट्टीपूर्वी त्याची परीक्षा होती. म्हणून तो नवीन exam पॅड घेण्यासाठी हट्ट करू लागला. लागलीच गावातीलच दुकानातून माझ्या भाच्याच्या हस्ते त्याला परीक्षा पॅड घेऊन यायला सांगितले. दुकानात भाचा गेला, आणि फोन करून म्हणाला मामू, पॅडवर शिवाजी महाराजांचा फोटो आहे, घेऊ का ?
मी म्हणालो, अरे त्यात विचार कसला ? घे ना ! छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला पॅड घेणं ही अभिमानाची बाब आहे.
उबैद घरी आला तेव्हा त्याने आनंदाने विचारले, “अब्बू, हे शिवाजी महाराज आहेत ना ?” मी हो म्हटले, आणि तो लगेच म्हणाला, शिवाजी महाराज की जय! त्याच्या मुखातून उमटलेला तो जयघोष मनात आदराची लाट घेऊन गेला.तस तर उबैद ला आता हळूहळू महापुरुषांची थोडक्यात माहिती सांगण्याचे काम मी नेहमीच करत असतो.
पण दुसऱ्या दिवशी उबैद थोडा खिन्न दिसला. शाळेतून परतल्यावर म्हणाला, अब्बू, तुम्ही हे पॅड मला का बरं दिले ?
मी विचारले, ..का रे, काय झालं ?
तो म्हणाला, काही मुलं मला चिडवत होती. म्हणाली, हे पॅड तुझं नाही, कोणाच तरी मागून आणलं आहेस. कारण यात शिवाजी महाराजांचा फोटो आहे. तू मुस्लिम आहेस ना!
क्षणभर मी थबकलो. सहा वर्षांच्या बालमनाला एवढा विचार कोण शिकवतो ? मी त्याला शांत करत म्हणालो, नाही रे बेटा, शिवाजी महाराज सगळ्यांचे आहेत. त्यांनी हिंदू-मुस्लिम भेदभाव न करता सर्वांचा सन्मान केला.
तो मला निरागसपणे म्हणाला, अब्बू, खरंच ना ?
मी त्याला हो म्हणत त्याच्या बोलण्याचे विषयांतर केले, पण अंतर्मनात विचारांच वादळ उठले होते.
आज समाजात उबैद सह असंख्य बाल मनावर घातक विचार नकळत बिंबवले जात आहेत. असे विचार लहान मुलांच्या डोक्यात येतात कसे?यामध्ये दोष कोणाचा ? पालकांचा, समाजाचा का राजकारणाचा,की माध्यमांचा ?
महाराष्ट्र ही संतांची, वीरांची भूमी आहे. या भूमीत शिवाजी महाराज हे केवळ एका धर्माचे नव्हे तर संपूर्ण मानवतेचे प्रतीक आहेत. तरीही समाजातील काही प्रवाह मुलांच्या निरागस मनात विभाजनाची रेषा आखताहेत.
जर हे असंच चालू राहिलं, तर उद्याचा भारत, उद्याची समाजव्यवस्था कोणत्या दिशेने जाणार हा प्रश्न प्रत्येक जबाबदार नागरिकाने स्वतःला विचारायलाच हवा.
कारण एक निरागस मुलगा विचारत होता अब्बू, हे पॅड माझे नाही ना ? मला प्रश्न पडतो
छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम अंगरक्षक व मावळे हे मुस्लिम त्यामध्ये सिद्दी इब्राहिम-अंगरक्षक (अफझल खान भेटीवेळी उपस्थित), मदारी मेहतर-अंगरक्षक (आग्र्याहून सुटकेवेळी मदत केली),नूर खान बेग-आरमार प्रमुख,
प्रमुख सरदारामध्ये…
सिद्दी जोहर,मसूद खान,अंबर वहाब,शमा खान,हुसेन खान,जाफर खान,दाऊद खान,
इब्राहिम पठाण-हे सर्व प्रमुख सरदार तर काझी हैदर हे वकील.हे सर्व दाखले छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वसामावेशक रयतेचे राजे होते याची साक्ष देतात.मात्र अलीकडील काळामध्ये या महान राजाला काही स्वयंघोषित धर्मवाद्यांनी महाराजांना मर्यादित करण्याचे कटकारस्थान रचले आहेत.त्याचाच परिणाम आज समाजापासून या लहान चिमुकल्यापर्यंत महाराज कोणत्या विचाराने पोहचले आहेत.हे समजत आहे.परत या चिमुकल्यांना महाराजांचा आदर्श, महाराजांचे रयतेविषयी प्रेम, आठरापगड जाती-धर्मातील समाजातील मावळे याचे धडे देणे आपणास खूप गरजेचे आहे हे मात्र नक्की !
आणि त्या एका निरागस प्रश्नात आपल्या समाजाची खरी परीक्षा लपलेली आहे !
लेखक : जावेद मुजावर