लातूर,दि.13(मिलिंद कांबळे)
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या असून, महिला आणि मुली असुरक्षित झाल्या आहेत. त्यांच्या न्यायासाठी आवाज उठवणार्यावरच हल्ले घडवून आणले जात असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीकडून लातूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली पाटील चाकणकर यांच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. आघाडीने डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात रूपाली चाकणकर यांनी केलेल्या असंवेदनशील वक्तव्यांचा निषेध नोंदवला. त्यांच्या महिला आयोग अध्यक्ष पदावरून तात्काळ हकालपट्टीची मागणी करण्यात आली. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलगा पार्थ पवार यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या महारवतन जमिनीतील ४३ एकर भ्रष्टाचार प्रकरणावर तात्काळ चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची आणि अजित पवार यांचा राजीनामा घेण्याची मागणीही करण्यात आली.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद, जिल्हा महासचिव अड रोहित सोमवंशी, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर, जिल्हा आयटी प्रमुख राहुल सोनवणे, डॉ. विजय अजनीकर, शहराध्यक्ष इंजिनीअर सचिन गायकवाड, शहर महासचिव आकाश इंगळे, महिला शहराध्यक्षा सुजाता आजनीकर, युवक जिल्हाध्यक्ष नितीन गायकवाड, तालुकाध्यक्ष सुनील कांबळे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.