लातूर पोलिसांची विक्रमी कारवाई; अवघ्या २० तासांत तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल
लातूर,दि.19
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या गंभीर प्रकरणात लातूर पोलिसांनी अतिशय संवेदनशीलपणे, तातडीची आणि उल्लेखनीय कारवाई करत आरोपीस तात्काळ अटक केली. सर्व तपास प्रक्रिया केवळ २० तासांत पूर्ण करून आरोपीविरुद्धचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करून पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांच्या नागरिक-केंद्रित कार्यपद्धतीची दणकट छाप उमटवली आहे.
दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार आरोपी इसराईल कलीम पठाण (२७, रा. गौसपुरा) हा दुपारी साडे-दोनच्या सुमारास फिर्यादीच्या घरात अनधिकृतरित्या शिरला व अल्पवयीन मुलीचा हात धरून विनयभंग केला. यापूर्वीही आरोपीने वारंवार पाठलाग करत धमक्या दिल्याचे उघड झाले. तक्रार मिळताच प्रकरणाचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तत्काळ गुन्हा क्रमांक ५३६/२०२५ भारतीय न्याय संहिता तसेच पोस्को कायद्यांतर्गत नोंदवला.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी तातडीने कठोर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी दोन स्वतंत्र शोधपथके तयार केली. पथकांनी गोपनीय माहिती संकलन, संभाव्य ठिकाणांची पाहणी व तत्पर हालचाली करत आरोपीस ताब्यात घेतले.
तपास अधिकारी पोउपनि गणेश चित्ते यांनी घटनास्थळ पंचनामा, पुरावे संकलन, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय प्रक्रिया आदी आवश्यक तपास कार्य वेगाने पूर्ण करून सक्षम पुरावे संकलित केले. सर्व प्रक्रिया पूर्ण करत अवघ्या २० तासांत आरोपीविरुद्धचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
या संपूर्ण कारवाईत पोउपनि श्रीमती पोवार, स फौ राजेंद्र टेकाळे, प्रकाश भोसले, रविसन जाधव, राहुल दरोडे, सचिन चंद्रपाटले, योगेश चिंचोलीकर, रवि कानगुले, सचिन जाधव, शिवानंद गिरबोने तसेच महिला पोलीस कर्मचारी संध्या कांबळे, सुमन कोरे, लता बनसोडे आणि राखी गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
लातूर पोलिसांच्या या जलद, संवेदी आणि कायदेशीर कारवाईने नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे. अल्पवयीन मुलींच्या संरक्षणासाठी लातूर पोलिस सदैव सज्ज असून कोणतीही छेडछाड, अत्याचार, संशयास्पद हालचाल दिसताच तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे..