दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात लातूरच्या बचत गटाचा सहभाग
लातूर,दि.21
दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा विक्री प्रदर्शनात लातूरच्या बचत गटास सहभागी होण्याची संधी मिळाली असून यात निलंगा तालुक्यातील अनसरवाड्याच्या पारंपरिक मऊ गोधडीने सर्वांनाच भुरळ पाडले. व्यापार मेळ्यासाठी आलेल्या दिल्लीकरांनी रुमा हसतकारी स्टॉलला चांगला प्रतिसाद दिला.
लातूर जिल्ह्यात प्रशासनाच्या पुढाकारातून महिला सक्ष्मीकरणासाठी उमेदच्या माध्यमातून बचत गट उभारणे, उद्योगासाठी प्रशिक्षण,उद्योजक बनविणे यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले जात असून त्याच प्रयत्नातून देशभरात नावाजलेल्या निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथील रुमा महिला बचत गटाने लातूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ मार्फत दिल्ली येथील महाराष्ट्र दालन येथे आयोजित केलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2025 अंतर्गत निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथील उमेद अंतर्गत पारंपरिक गोधडी बनवणाऱ्या रूमा हस्तकारी बचत गटास सहभागी होण्याची संधी मिळविली. थंडीच्या दिवसात दिल्लीत आयोजित केलेल्या या व्यापार मेळामध्ये पारंपरिक गोधडी स्टॉलला दिल्लीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून यामुळे दिल्लीकरांना मऊ गोधडीची ऊब अनुभवाला मिळत आहे.
दिल्ली येथील आयोजित या मेळामधील गोधडी स्टॉलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन स्टॉलधारक रुक्मिणी पटसाळगे यांचेशी संवाद साधून पारंपरिक गोधडी विषयी माहिती जाणून घेतली व विक्रीसाठी प्रेरित करून शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या नेतृत्वाखाली, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा लातूर संजय इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या उमेद अभियानातील रूमा बचत गटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रकल्प संचालक यांनी कौतुक केले. जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, जिल्हा व्यवस्थापक विपणन वैभव गुराळे यांनी रूम बचत गटाला सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्टॉलला भेट दिल्लीत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात महाराष्ट्रातील आणि दिल्लीकरांच्या पसंतीस पडलेल्या लातूर जिल्ह्यातील अनसर वाडा येथील रुमा महिला बचत गटाच्या स्टॉलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा भेट देऊन पारंपरिक गोधडीची माहिती घेत महिलांना प्रोत्साहन दिले.