अंबुलगा बु. येथे विद्यार्थ्यांसमोर अंधविश्वासांची निर्भीड पोलखोल
निलंगा,दि.२४
समाजाला मागासलेपणाकडे ढकलणाऱ्या अंधश्रद्धा, अंधविश्वास आणि भीतीच्या साखळदंडातून भावी पिढीची मुक्तता करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशाला, अंबुलगा बु. येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने धगधगता व प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञाननिष्ठ, तर्कशुद्ध आणि निर्भय विचारांची ठिणगी पेटली.
या कार्यक्रमासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या मा. भोसले सर यांनी प्रत्यक्ष वैज्ञानिक प्रयोगांच्या साहाय्याने भूत-प्रेत, करणी, जादूटोणा, ग्रहदोष, अपशकुन यांसारख्या अंधश्रद्धांची निर्भीडपणे पोलखोल केली. भीती निर्माण करून समाजाची फसवणूक करणाऱ्या खोट्या समजुती कशा पद्धतीने पसरवल्या जातात, हे त्यांनी शास्त्रीय पुराव्यांसह स्पष्ट केले.
“तर्क नसेल, तर विश्वास नको!” असा ठाम संदेश देत भोसले सरांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक दाव्यामागे प्रश्न विचारण्याची सवय लावण्याचे आवाहन केले. प्रयोगांचे थेट सादरीकरण पाहताना विद्यार्थी अचंबित झाले होते. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील भीती, शंका आणि गैरसमज मोकळेपणाने मांडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय संविधानाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. संविधानात नमूद केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि प्रगतीशील मूल्यांचा अंगीकार करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक मा. शिवशंकर मिरगाळे, उपसरपंच मा. जगदीश सगर, इंदिरा कन्या शाळेचे मुख्याध्यापक मा. सूर्यवंशी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष दिनेश कांबळे, कुलकर्णी सर, गिरी सर, पाटील सर, मुळजे सर, मिरगाळे मॅडम, बिराजदार मॅडम, शानिमे मॅडम तसेच इंदिरा कन्या शाळेचे पाटील सर, सुडे सर, गिरी सर, नागमोडे मॅडम आदी मान्यवर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा उपक्रम अंधश्रद्धा, भीती आणि अज्ञानाविरोधातील लढ्याला बळ देणारा ठरला असून, समाजप्रबोधनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
