अवकाळी पावसाचा कासार सिरसी भागास मोठा फटका दिवसभर झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांची उडाली धांदल
निलंगा,२९(मिलिंद कांबळे)
तालुक्यातील कासारशिरसी सह या भागातील तीन महसुली विभागात मंगळवार दिनांक 28 रोजी मान्सूनोत्तर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली तर संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागरात मोथा चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबामुळे परिसरात पुन्हा पावसास पोषक वातावरण निर्माण झाले आहे हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला होता त्यानुसार राज्याच्या सीमा भागात पावसास जोरदार प्रारंभ झाला असून नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
कासार शिरशी सह या भागात कासार बालकुंदा, सरवडी, मदनसुरीसह सर्वच भागात जोरदार पाऊस झाला या पावसामुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या असून रब्बी हंगाम हा हातचा जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे नगदी तुर पीक हे हातचे गेले असून वातावरणातील बदलामुळे या भागात पाणदुहीसह पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.