– राजेंद्र लातूरकर
लातूर, दि.१२ (मिलिंद कांबळे)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व हिमालयापेक्षा भव्य होते. जगप्रसिद्ध विद्यापीठांतून मिळवलेले ज्ञान त्यांनी समाज आणि राष्ट्रोन्नतीसाठी वाहिले, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारांचे अभ्यासक व जेष्ठ विधिज्ञ राजेंद्र लातूरकर यांनी केले.
पाली भाषा प्रचार समिती, अंबाजोगाई आयोजित महापरिनिर्वाण दिनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते.
लातूरकर म्हणाले की, “बाबासाहेबांनी समाजकारण, राजकारण, अर्थकारण, शिक्षण, साहित्य, कायदेकानून, पत्रकारिता, कृषी, वीज, जलधोरण, कामगार, महिला अशा असंख्य क्षेत्रात अतुलनीय कार्य केले.”
त्यांचे शिक्षणविषयक धोरण आजही मार्गदर्शक ठरते. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले होते.
बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत अशी चार वृत्तपत्रे चालवून वाणी आणि लेखणीच्या जोरावर समाजजागृतीची पराकाष्ठा केली. त्यांनी ६५ वर्षांच्या आयुष्यात २२ खंडांचा विशाल ग्रंथसंग्रह निर्माण केला असून अनेक ग्रंथ प्रकाशनाधीन आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पायाभरणी देखील बाबासाहेबांच्या “दि प्रॉब्लेम ऑफ रुपी” या ग्रंथावरच झाली असल्याचा महत्त्वाचा उल्लेख त्यांनी केला.
लातूरकर पुढे म्हणाले, “सर्व धर्मांवरील २१ वर्षांच्या तुलनात्मक अभ्यासानंतर बाबासाहेबांनी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या समाजबंधूंनाही दिली. अशोकचक्रांकित तिरंगा, सिंहशीर्ष असलेली राजमुद्रा आणि ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीद त्यांनी भारताला दिले. त्यामुळे भारत बौद्धमय झाला.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. यश कस्यपायन महाथेरो म्हणाले की मानवी जन्म दुर्लभ असून उत्तम कार्यांनी जीवनाचा अर्थ साधला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्मकार्य, लेखन आणि समाजसेवा शब्दातीत आहे. रंगूनच्या धम्मसंगीतीत त्यांना “बोधिसत्त्व” ही उपाधी त्यांच्या दानपारमितेमुळे प्रदान करण्यात आली, हे त्यांनी नमूद केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले भारतीय संविधान ही त्यांची सर्वोत्तम देशहितकारक कामगिरी असल्याचेही त्यांनी सांगितले. संविधान सभेत विचारलेल्या ७ हजार प्रश्नांना त्यांनी अभ्यासपूर्ण उत्तरं देत संविधानाला अंतिम रूप दिले.
महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादन सभेला देशभरातून श्रोते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्रा. डॉ. कीर्तिराज लोणारे, तर आभार प्रदर्शन प्रा. सुनील पुंडकर यांनी केले. धम्मपालन गाथेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.