रक्षकच बनले भक्षक!
“आमचा रस्ता बंद करू नका!” संतप्त ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा…
निलंगा,दि.12
मौजे माळेगाव (क), ता. निलंगा, जि. लातूर येथे ग्रामपंचायतीनेच बौद्ध समाजाच्या वस्तीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम सुरू केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे गावात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध आवाज उठवला आहे. गावाच्या दक्षिण बाजूस असलेला दक्षिण-उत्तर रस्ता हा वर्षानुवर्षे बौद्ध वस्तीतील लोकांचा मुख्य मार्ग होता. पण आता त्या रस्त्यावरच सांस्कृतिक सभागृहाच्या नावाखाली बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या अवैध बांधकामामुळे नागरिकांना हालचालीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर उभे राहिलेले बांधकाम नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे बांधकामाच्या ठिकाणी कोणताही माहितीफलक नाही, निधीचा तपशील नाही, मालकीची माहिती नाही, आणि कामकाज पूर्णपणे गुप्ततेत सुरू आहे.
पूर्वी 10 फूट रुंदीचा असलेला हा सार्वजनिक रस्ता आता फक्त नावालाच उरला आहे. प्रशासन या बेकायदेशीर प्रकाराकडे कानाडोळा करत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष आहे.
या प्रकाराबाबत राम धोंडीबा पोस्ते, वामन दंडेगान, श्रीधर धोंडीबा पोस्ते आणि इस्माईल पोस्ते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर आणि गट विकास अधिकारी पंचायत समिती निलंगा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर बेकायदेशीर बांधकाम तात्काळ थांबवले नाही, तर अमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
जर “जे रक्षणकर्तेच भक्षक बनले, तेव्हा न्याय मागायचा कोणाकडे?”
याबाबत पीडित ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, संबंधित विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून बौद्ध वस्तीच्या हक्काचा रस्ता मोकळा करावा. अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल, असा ठाम इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.