देवणी,दि.२६
“भारतीय संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मुलत्वाचे पालन करणाऱ्यांना समाजात खरी स्वतंत्रता मिळू शकते. ज्या दिवशी भारतीय समाज संविधानाला समजून, त्याचे पालन करेल, त्या दिवशी आपल्याला तिसरी ‘आझादी’ प्राप्त होईल.”असे मत देवणी चे गटविकास अधिकारी सागर वरंडेकर यांनी व्यक्त केले.
ते संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करून झाली. त्यानंतर गटविकास अधिकारी सागर वरंडेकर यांचा लोकवैभव वृत्तपत्राचे संपादक गिरीधर गायकवाड नागराळकर यांच्या वतीने संविधानाची प्रत देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास सहा गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, विस्तार अधिकारी, सहा. आय.सी.डी.एस., कनिष्ठ कार्यक्रम अधिकारी तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अशोकराव कट्टेवार यांनी केले.
सागर वरंडेकर यांनी उपस्थितांना संविधानाच्या महत्वावर भाष्य करताना समाजातील प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करणे अनिवार्य आहे असे सांगितले.