लातूर, दि.१७
माता भिमाई रामजी आंबेडकर बचत गट, लातूर, नालंदा बुद्ध विहार व प्रज्ञा महिला मंडळ, प्रकाश नगर लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने नालंदा बुद्ध विहार, प्रकाश नगर येथे भारताचे महान सुपुत्र, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जन्म देणाऱ्या महामाता भिमाई रामजी आंबेडकर यांची १७२ वी जयंती अत्यंत भक्तिभाव व उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक प्रा. बापूसाहेब गायकवाड प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. आपल्या भाषणात ते म्हणाले की, भिमाईंच्या त्याग, खंबीरपणा आणि धाडसी वैचारिकतेमुळेच बाबासाहेबांसारखा युगपुरुष घडला. भीमाबाई आणि रामजी बाबा यांच्या विचारांची सांगडच बाबासाहेबांच्या शिक्षणाची पायाभरणी ठरली. कठीण परिस्थितीतही मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी मंजुळा व तुळसा यांच्या मदतीने सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवून पुस्तके विकत घेतली. हा त्यागच पुढे भारताच्या भवितव्याचा पाया ठरला, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी करुणाताई सूर्यवंशी यांनीही आपले मनोगत व्यक्त करत भिमाईंच्या कर्तृत्वाचा गौरव केला. कार्यक्रमाला माता भिमाई रामजी आंबेडकर बचत गट, नालंदा बुद्ध विहार, प्रज्ञा महिला मंडळ, तसेच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूरचे पदाधिकारी, परिसरातील उपासक-उपासिका व बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. विलास आल्टे यांनी केले. विहाराचे ट्रस्टी ज्ञानोबा सुरवसे, बचत गटाचे सचिव विकास दंतराव, समता सैनिक दलाचे असिस्टंट लेफ्टनंट जनरल राजाराम साबळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, प्रेमनाथ कांबळे, राजाभाऊ उबाळे, विद्रोही कवी दिलीप गायकवाड, हनमंत टेकाळे, संजय गायकवाड, संदीप सूर्यवंशी, बिभीषण गंभीरे, प्रकाश अडसुळे, डी. एम. कांबळे, विद्याताई सुरवसे, परमेश्वरे ताई आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप सरणत्तयने करण्यात आला.