भीम आर्मी – निलंगा शाखेकडून राष्ट्रपतींना निवेदन**
निलंगा, दि. 20
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा निषेध करत भीम आर्मी – निलंगा शाखेने आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी राष्ट्रपती महोदयांकडे निवेदनाद्वारे केली. हे निवेदन उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्या मार्फत सादर करण्यात आले.
निवेदनात आरोपीवर तातडीची कारवाई करून फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवावा आणि न्याय प्रक्रियेला कोणताही विलंब होऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. “विलंब म्हणजे गुन्हेगाराचे मनोबल वाढवणे,” असेही नमूद करण्यात आले.
चार वर्षांच्या बालिकेवरील अत्याचार हा राक्षसी गुन्हा असून दोषी सिद्ध झाल्यावर आरोपीला तात्काळ फाशी देणे आवश्यक असल्याचे भीम आर्मीने स्पष्ट केले आहे.
महिला व बालकांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कठोर राष्ट्रीय कायदा लागू करावा, प्रकरणांचा सहा महिन्यात निकाल लागावा आणि तपासासाठी ठरलेली वेळमर्यादा बंधनकारक करावी, अशीही मागणी पत्रात करण्यात आली.
तपास निष्पक्ष व्हावा म्हणून स्वतंत्र SITची नियुक्ती करावी, तसेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदत, सुरक्षा आणि मानसिक सहाय्य तातडीने द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
“पीडितेला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा भीम आर्मी – निलंगा शाखेने दिला. या निवेदनामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.