निलंगा येथे 360 वा स्मृतिदिन उत्साहात साजरा; ऐतिहासिक वारशाचे स्मरण…
निलंगा, दि. 10 (वा)
निलंगा शहरात इतिहासाचा वारसा जपणारा आणि मराठा साम्राज्याच्या परंपरेला उजाळा देणारा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांचे मामेभाऊ तसेच राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचे भाचे दत्ताजीराजे बहादुरजीराजे जाधवराव यांच्या 360 व्या स्मृतिदिनानिमित्त समाधी पूजन व अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
जंगम बसय्या मठ परिसर, अशोकनगर निलंगा येथील समाधीस्थळी भक्तिमय वातावरणात पूजन विधी पार पडला. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून लखुजीराजे जाधवराव यांचे सतरावे वंशज डॉ. नरेशराजे जाधवराव यांनी दर्शविली. त्यांनी आपल्या मनोगतात दत्ताजीराजे यांच्या कार्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडून सांगितली तसेच त्यांच्या शौर्य, त्याग आणि नेतृत्वाचे स्मरण उपस्थितांना करून दिले.
या वेळी भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव एम. एम. जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, जिल्हा संघटक विनोद सोनवणे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांनी समाधीस्थळी अभिवादन अर्पण करून दत्ताजीराजे जाधवराव यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला. श्रद्धा, अभिमान आणि ऐतिहासिक जागरूकतेचा संगम घडवणारा हा स्मृतिदिन सोहळा अत्यंत भावनिक आणि मर्यादित पद्धतीने संपन्न झाला.