निलंगा, दि. ०४
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यभरातील शाळांमध्ये जागतिक दिव्यांग दिन वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बडूरमध्ये भव्य पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.
इयत्ता पहिली ते चौथी वर्गातील जवळपास 100 विद्यार्थी शिकत असून, “100% उपस्थिती आणि 100% गुणवत्ता” हेच शाळेचे ब्रीदवाक्य आहे. दिव्यांग दिनानिमित्त सुप्रसिद्ध जागतिक अंध लेखिका हेलन केलर, अंध लिपी निर्माते लुईस ब्रेल आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शाळेतील दिव्यांग विद्यार्थी आणि गावातील दिव्यांग व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
दिव्यांग विभागाचे विशेष शिक्षक श्री धीरज पाटील यांनी दिव्यांगांच्या 21 प्रकारांबाबत सखोल मार्गदर्शन केले. पालक मेळाव्यात शाळेचे मुख्याध्यापक श्री बळवंत सरवडे यांनी विद्यार्थी उपस्थिती,खान अकॅडमी, लोकसहभाग, मुख्यमंत्री “माझी शाळा सुंदर शाळा”, निपुण महाराष्ट्र, विद्यार्थ्यांचे मूल्यशिक्षण आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता याचा सर्व अहवाल पालकांसमोर सादर केला.
पालक मेळाव्यासाठी जवळपास 100% पालक उपस्थित होते. गावचे सरपंच, उपसरपंच आणि पालकांनी शाळेसाठी सर्वोच्च सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचा समारोप केंद्रप्रमुख श्री दिगंबर माचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. आणि चहापानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमातून शाळा, पालक आणि स्थानिक प्रशासन यांचा सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी याचा उत्कृष्ट नमुना दिसून आला.