– रामकुमार रायवाडीकर
लातूर,दि.०६
थोर राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी, मानवतावादी विचारांचे मूल्य नाकारणारा संघ राष्ट्राचे विघटन करणारा आहे, असा ठळक इशारा अ. भा. समाजवादी शिक्षण हक्क सभेचे राज्यउपाध्यक्ष रामकुमार रायवाडीकर यांनी आज दिला. महापारिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर पार्क लातूर येथे आयोजित मुक्तसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादनाने झाली. एनसीआयबीचे जिल्हा संचालक व संपादक श्री शिरीषकुमार शेरखाने,अधिकारी श्री सुधीर चेरेकर, ज्येष्ठ समाजसेवक शाम वरयानी व श्री गणपतराव तेलंगे यांनी उपस्थितीत पुष्पहार अर्पण केला.
रामकुमार रायवाडीकर पुढे म्हणाले की, “संघाचे चारित्र व्देशा आणि अन्यायावर आधारित आहे. स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधानाचा त्यांना तीव्र विरोध आहे. थोर राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या, संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांवरील अत्याचार, राजे छत्रपती शिवाजी, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यावर छळ तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी व गौरी लंकेश यांची क्रूर हत्या याच विचारधारेच्या व्देशा आणि असहिष्णुतेवर आधारित होती.”
ते पुढे म्हणाले, “संघ सतत समाजात व्देश पसरवतो, सत्य नाकारतो, खोटेपणाचा प्रसार करतो, संभ्रम निर्माण करतो आणि नव्याने जातीय वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. डॉ. आंबेडकर, त्यांचे विचार व संविधान यांचे लक्ष्य करणे ही राष्ट्रविरोधी, विकासविरोधी आणि देशघाती कृती आहे.”
कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. डी. एन. भालेराव मेथीकर, ऍड. मधुकरराव कांबळे, गोपाळतात्या चिकाटे, पत्रकार राजेंद्र कांबळे, सामाजिक कार्यकर्ते सूरज पाटील, ज्येष्ठ पत्रकार बाळ होळीकर, प्रा. दिनकर कांबळे, लिंबराज गवळी, संभाजीराव पानचिंचोलीकर, अतुल कांबळे, पंडितराव चाकूरकर, रोझा आर. आर., चंद्रकलाताई कांबळे, चंद्रकांत शिंदे, बी. बी. गायकवाड, संतोष सोनवते, श्री एस. पी. वरयानी, दिगंबर सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
रामकुमार रायवाडीकर यांनी स्पष्ट इशारा दिला की, “विचारविरोधी संघाच्या कार्यवाहीवर लक्ष ठेवणे आणि डॉ. बाबासाहेबांच्या समतावादी, मानवतावादी शिकवणीचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.”