
लातूर,दि.०२(मिलिंद कांबळे)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीग,लातूर व यश सिद्धी आजी माजी सैनिक वेल्फेअर असोशिएशन ,शाखा लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवरील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर घेण्यात आलेल्या जाहीर समारंभात महार रेजिमेंटच्या स्थापनेचा ८५ वा वर्धापन दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला.
लातूर जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांना या प्रसंगी मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीगचे उपाध्यक्ष ॲड.राजेंद्र लातूरकर यांनी महार रेजिमेंटने केलेल्या ऐतिहासिक कार्यावर तथा त्यांच्या शौर्यपूर्ण कर्तृत्वावर विस्तृत भाष्य केले. याचबरोबर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितोन्नतीसाठी जीवनभर केलेल्या संघर्षाची मालिका मांडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीग हे संघटन शोषित , पीडित व अन्यायग्रस्त यांच्यासाठी मोफत कायदेशीर सेवा देत आहे आणि सदर संघटना ही महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन गेली ८ वर्षे निरंतर कार्यरत असल्याचे सांगितले.* या समारंभाचे आयोजक असलेले माजी सैनिक राजाराम साबळे यांनी भारतीय सैन्याच्या महार रेजिमेंट या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा दशदिशात फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. महार रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक महत्त्वाचे सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना १ ऑक्टोबर १९४१ मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.स १९४१ च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. या रेजिमेंटमध्ये मुख्यत्वे सगळ्या समाजाचे सैनिक आहेत. महार रेजिमेंट या सैन्यदलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत, असे मत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित असलेल्या आजी माजी सैनिकांना सलामी देऊन मानवंदना देण्यात आली. तसेच माजी सैनिक मेजर राजाराम साबळे यांना प्रातिनिधिक स्वरूपात २५ नोहेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत केलेल्या भाषणाची पुस्तिका डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीगचे कार्यकारी अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.शिवकुमार बनसोडे यांनी भेट दिली. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीगचे अध्यक्ष ॲड.जांबुवंतराव सोनकवडे, उपाध्यक्ष ॲड.भारत ननवरे, सहसचिव ॲड.प्रशांत गायकवाड, कोषाध्यक्ष ॲड.संजय कांबळे,विशेष सरकारी वकील अँड. लक्ष्मण शिंदे , ॲड प्रदीप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी समता सैनिक दलाचे व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्यातील पदाधिकारी मेजर राजाराम साबळे,अभिमन्यू लामतुरे, आनंद डोनेराव ,विलास सोनवणे,बळीराम लोकरे, ज्ञानेश्वरी बटवाड मॅडम आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीगचे सचिव ॲड.सचिन कांबळे यांनी केले.