– केशव कांबळे
लातूर, दि. ०६
“एक व्यक्ती एक मत आणि एकच मूल्य” ही जगाच्या लोकशाहीसाठी वाट दाखवणारी संकल्पना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना दिलेली अमूल्य देणगी आहे.
भारत त्या काळी धर्माधिष्ठित जातीय व्यवस्था आणि विषमतेने वेढलेला होता. सामान्य नागरिक, स्त्रिया, अस्पृश्य, कामगार, शेतकरी या सर्वांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आलेला होता. अशा परिस्थितीत २३ डिसेंबर १९१९ रोजी साऊथ ब्युरो आयोगासमोर बाबासाहेबांनी दिलेली साक्ष ही भारतीय लोकशाहीचे स्वरूप बदलणारी ठरली, असे आवाहन केशव कांबळे यांनी केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैषाली बुद्धविहार, बौद्धनगर (लातूर) येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला उपस्थित उपासक उपासिकांनी तथागत भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
या वेळी बोलताना केशव कांबळे पुढे म्हणाले की,ब्राह्मण, ब्राह्मणेतर,हिंदू आणि अस्पृश्य या घटकांतील खोलवरच्या विषमतेमुळे सत्ता व शिक्षण मोजक्या वर्गापुरते मर्यादित होते. या अन्यायकारक निकषांना छेद देत, संपत्ती–शिक्षणाच्या अटींचा पगडा हटवून, सर्व भारतीय स्त्री–पुरुषांना समान आणि सार्वत्रिक मतदानाचा अधिकार द्यावा, अशी निर्भीड मागणी बाबासाहेबांनी मांडली हे विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आले. ते पुढे म्हणाले की, १९२८ मध्ये सायमन कमिशनसमोर, नंतर गोलमेज परिषदेतही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वत्रिक प्रौढ मताधिकारासाठी सातत्याने आवाज उठवला.
ब्रिटिश सरकार, काँग्रेस, उच्चवर्णीय हिंदू आणि मुस्लिम लीग या सर्व शक्तींशी एकाचवेळी झुंज देत असतानाही बाबासाहेबांनी भारतीयांना समान मताधिकार मिळवून देण्यासाठी अपार संघर्ष केला.
भारतीय राज्यघटना तयार करताना “आम्ही भारताचे लोक” या शब्दांतून सत्तेचे केंद्र स्वतः जनतेकडे देणारे प्रावधान बाबासाहेबांनी नव्या भारताला दिले. यामुळे लोकशाही खर्या अर्थाने लोकांची, लोकांसाठी आणि लोकांद्वारे चालणारी बनली, असे मत कांबळेंनी व्यक्त केले.
“मतदान हा फक्त अधिकार नाही, तर भारताचा नागरिक म्हणून आपली ओळख जपण्याचा सर्वोच्च मार्ग आहे. प्रत्येकाने आपल्या मताची किंमत ओळखून मतदानाचा हक्क निष्ठेने बजावला पाहिजे.”असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
कार्यक्रमाला समाजबांधवांची उपस्थिती लक्षणीय होती.

मिलिंद कांबळे,लातूर
मो.9960049411