लातूर,दि.२५
लातूर पोलिसांना गुंगारा देऊन 19 वर्षांपासून फरार असलेल्या देवणी तालुक्यातील रहिवाशी आरोपीस जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने जेरबंद केले आहे.
2006 साली गांधी चौक पोलीस ठाण्यात देवणी तालुक्यातील बोबळी येथील रहिवाशी असलेला अभंग प्रभु उर्फ प्रभाकर सूर्यवंशी वय 53 वर्षे याच्या विरोधात फसवणूकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर तो पळून जाऊन सतत ठिकाण बदलत राहिल्याने तो सापडत नव्हता. तो गावोगाव फिरत राहून स्वतःला ग्रामपंचायत टाकळीचा सरपंच असल्याचे भासवून, बोगस जन्म दाखले तयार करून नागरिकांची फसवणूक करीत होता. मी ग्रामपंचायत टाकळीचा सरपंच आहे असे सांगून मुलांचे कोरे जन्मदाखले भरून, स्वतःचे बनावट स्वाक्षरी- शिक्के मारून बनावट दाखले दिले.हे दाखले शाळेत दिल्यावर शिक्षकांनी संशय घेतला. आरोपीला विचारणा केल्यावर तो सरपंच नसल्याचे उघड झाले त्याने 29 मुलांचे बोगस जन्मदाखले तयार करून प्रत्येकी 40 ते 50 रुपये घेतले होते.
हे दाखले शाळांमध्ये पहिलीमध्ये प्रवेशासाठी वापरण्यात आले. त्या वेळी तपासिक पोउपनि सी.एम. गोरे यांनी सरपंच कार्यालयाचे शिक्के, हस्ताक्षर नमुने, बोगस फॉर्म आदी मुद्देमाल पंचनाम्यात जप्त केला होता. विशेष पथकास आरोपी बोबळी (बु.) ता. देवणी भागात राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली. अपर पोलीस अधीक्षक लातूर यांना कळवून त्वरित पथकाने छापा टाकला. कारवाईमध्ये आरोपी आपल्या घरी 23 नोव्हेंबर रोजी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन गांधी चौक येथे हजर करण्यात आले.आरोपीस न्यायदंडाधिकारी यांच्यासमक्ष हजर केल्यावर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सपोनि शिवशंकर मनाळे, पोउपनि संजय भोसले, दत्तात्रय शिंदे, श्रीकांत कुंभार यांनी केली आहे.