लातूर, दि. 10
शहर पोलीसांच्या विशेष पथकाने ३४ वर्षांपासून न्यायालय व पोलीस प्रशासनास गुंगारा देणाऱ्या घरफोडी गुन्ह्यातील आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, घरफोडीच्या आरोपाखाली
बालाजी हरीभाऊ सरवदे (वय ५८ वर्ष, रा. वालेनगर, लातूर, ह.मु. सेलू ता. औसा, जि. लातूर.याच्यावर १९९१ साली झालेल्या घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणानंतर सतत वास्तव्याचे ठिकाण बदलत राहून पोलिस व न्यायालयास चकवा देत होता अनेक वर्षे शोधकार्य करूनही आरोपी सापडत नव्हता.दि. ०१ मार्च १९९१ रोजी आरोपी व त्याचे तीन साथीदारांनी फिर्यादी फुलचंद रामराव सूर्यवंशी (रा. कोल्हेनगर, लातूर) यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी केली होती. फिर्यादी हे दि. २७ फेब्रुवारी १९९१ रोजी सकाळी १० वाजता औरंगाबाद येथे कामानिमित्त गेले होते व २८ फेब्रुवारी १९९१ रोजी सायंकाळी घरी परतल्यावर घरफोडी झाल्याचे त्यांना आढळले.घरातून फिलिप्स कंपनीचा टेप रेकॉर्डर, सोन्याच्या काड्या – ४० ग्रॅम वजनाच्या,लहान मुलाचा सोन्याचा करदोरा – ६० ग्रॅम वजनाचा चांदीची चैन व जोड,बॅटरी,५० रुपयांच्या २० नोटा (रु. ३५००/-) एकूण रु. ३५८०/- किंमतीचा ऐवज चोरीस गेला होता.याप्रकरणी गांधी चौक पोलीस स्टेशन, येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.अनेक वर्षांच्या शोधानंतर पोलीस अमलदार दत्तात्रय शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी बालाजी सरवदे हा आपल्या सासरवाडीत सेलू (ता. औसा, जि. लातूर) येथील झोपडपट्टी भागात वास्तव्य करत आहे. त्यानुसार मिळालेल्या माहिती पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांना कळविण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून आरोपीस त्याच्या सासरवाडीतून ताब्यात घेतले.
यानंतर आरोपीला दि. ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली. आरोपीस योग्य पोलिस बंदोबस्तात मा. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता मा. न्यायालयाने आरोपीस 22 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनात पथकातील सपोनि मनाळे पोलीस अमलदार दत्तात्रय शिंदे, राजेश्वर कांदे, योगेश गायकवाड, श्रीकांत कुंभार यांनी केली आहे.
सदर आरोपीवर ३४ वर्षांपूर्वी गुन्हा दाखल असूनही तो इतक्या दीर्घकाळ फरार राहिला होता.लातूर पोलिसांच्या सततच्या प्रयत्नामुळे आणि गोपनीय माहितीच्या आधारे हा जुना प्रकरणातील फरार आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आला.
ही कारवाई लातूर पोलिसांच्या गुन्हे शोध क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे.