तहसीलदारांकडे निवेदन
निलंगा, दि.24
निलंगा तालुक्यातील मौजे गुंजरगा येथील ४१ शेतकऱ्यांना सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टीसंदर्भातील मंजूर अनुदान अद्याप मिळाले नसल्याने शेतकरी वर्गात चिंता व संताप व्यक्त होत आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतरही शासन अनुदान खात्यात जमा न झाल्याने शेतकऱ्यांनी तहसीलदार निलंगा यांना निवेदन दिले.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की,
“शासनाने अनुदान मंजूर केले, मात्र रक्कम आमच्या खात्यात पोहोचली नाही. विलंब का होतोय हेही आम्हाला सांगितले जात नाही.”
यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी अधिकच वाढल्या असून, अनेक कुटुंबांवर उपजीविकेचे संकट निर्माण झाले आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की,
अनुदान त्वरित जमा न झाल्यास पुढील काळात आम्हाला उपोषणासारखे पर्याय स्वीकारण्याची वेळ येऊ नये.
आम्ही आमचा हक्क मागत आहोत, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.
या निवेदनावर दिलीप शिंदे, दत्ता शिंदे, वसंत शिंदे, वैजीनाथ धुमाळ, शंकर धुमाळ, भरत गोबाडे, शिवाजी भोसले, कस्तुराबाई धुमाळ, प्रताप गोबाडे, रामकुमार सोळंके यांच्यासह एकूण ४१ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार,
अनुदान वेळेवर न मिळाल्याने बी-बियाणे, घरखर्च, शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागवण्यासही अडचणी येत आहेत.
तहसीलदारांकडे अनुदानाच्या विलंबाबाबत तातडीने चौकशी करून रक्कम वितरित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गावात या मुद्द्यावर चर्चा रंगत असून,
प्रशासनाकडून सकारात्मक पाऊल उचलले नाही तर पुढील काही दिवसात या प्रश्नाचे गांभीर्य वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.