– पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही
लातूर, दि.10(मिलिंद कांबळे)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सोमवार, १० तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अधिकृत प्रक्रिया सुरू झाली. मात्र प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांमध्ये एकही अर्ज दाखल न झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. अहमदपूर, निलंगा, औसा, उदगीर नगर परिषद तसेच रेणापूर नगर पंचायत या सर्व ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालये व नियुक्त केंद्रे सज्ज ठेवण्यात आली होती. सकाळपासून कर्मचारी तैनात असले तरी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थिती लावली नाही.
निवडणूक शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पहिल्या दिवशी अर्ज दाखल न होणे ही नवीन बाब नाही. बहुतांश उमेदवार पक्षांतर्गत चर्चेच्या प्रतीक्षेत असतात. पॅनेल निश्चिती, गट-तटबाजी, तसेच पक्षांतील तिकीटवाटप यामुळे उमेदवार शेवटच्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याची रणनीती ठेवतात.
यंदाच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर कोणाचे वर्चस्व प्रस्थापित होणार याची उत्सुकता आहे. लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी महापालिका नसली तरी नगरपरिषदांची निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची मानली जाते. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट), शिवसेना (दोन्ही गट) यांच्यातील अंतर्गत समीकरणांमुळे उमेदवारांच्या घोषणेची प्रक्रिया उशिरा होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.दरम्यान, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारांना शांततेत व नियमांनुसार अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले असून पुढील दिवसांत अर्ज दाखल करण्याच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.अर्ज दाखल करण्यासाठी तसेच तुल्यबळ उमेदवार मिळावा यासाठी शेवटच्या दोन दिवसांत केंद्रांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.