निलंगा,दि. ०३
कासार सिरसी ते रामलिंग मुदगड रस्त्यावर सुरू असलेल्या पूल बांधकामाने विकासाचा चेहरा दाखवण्याऐवजी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे. रामलिंग–मुदगड मार्गावरील ओढ्यावर पूल उभारणीचे काम सुरू असले, तरी पर्यायी मार्गांची कोणतीही ठोस व्यवस्था न केल्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. परिणामी, बस सेवा पूर्णपणे बंद पडली असून सामान्य नागरिकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे.
या मार्गावरून दररोज प्रवास करणारे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत, कामगारांना कामावर जाणे कठीण झाले आहे, तर शेतकऱ्यांना बाजारपेठ गाठणे अवघड बनले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडथळे निर्माण होत असून, आपत्कालीन परिस्थितीत जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. “आजारी माणूस वेळेत दवाखान्यात पोहोचला नाही तर जबाबदार कोण?” असा जळजळीत सवाल नागरिक विचारत आहेत.
कासार सिरसी–नारंगवाडी मार्गाचे चौपदरीकरण, नाली व पूल बांधकाम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विकासकामे स्वागतार्ह असली, तरी त्यासाठी जनतेला मूलभूत सोयींपासून वंचित ठेवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आता उभा राहत आहे.
विशेषतः स्मशान भूमीजवळील ओढ्यावर सुरू असलेल्या कामामुळे शहरात येणारा मुख्य रस्ता बंद झाला आहे. हा रस्ता पर्यायी स्वरूपात तातडीने सुरू करणे अपेक्षित असताना, संबंधित काम रखडल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. “रस्ता नाही, बस नाही, आणि प्रशासनाचे लक्षही नाही, मग आम्ही जगायचं कसं?” अशी हतबल भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
शहर परिसरातील पाणंद मुक्त अभियानही कागदावरच अडकून पडल्याचे दिसत आहे. स्मशानभूमी ते चौधरी पाटील, वाघमारे शेत, सोनामाता डोंगर ते निलंगा रोड, जुनी निलंगा गाडीवाट, हत्तरगा रोड ते गिरीश चिंचनसुरे यांचा मळा, तसेच बाजीराव पाटील, माणिक पाटील ते जुनी वागदरी गाडीवाट, बडी बेस उमरगा रोड तसेच रामलिंग–मुदगड, नाकाडा मारुती ते शिव पाणंद रस्ता उमरगा रोड हा शहर बाह्य वळण रस्ता पाणंद मुक्त करावा. या अत्यंत महत्त्वाच्या पाणंद रस्त्यांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. या रस्त्यांमुळे ग्रामीण भागातील जीवनरेषाच जोडली जाते, मात्र आज तीच जीवनरेषा खंडित झाल्याचे चित्र आहे.
नागरिकांचा स्पष्ट इशारा आहे की, विकास हवा, पण तो जनतेच्या हालांवर नाही. प्रशासनाने तात्काळ परिस्थितीची दखल घेऊन पर्यायी रस्ते तातडीने सुरू करावेत, रखडलेली पाणंद कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत आणि बंद असलेली बस सेवा पूर्ववत करावी. अन्यथा, हा प्रश्न केवळ नाराजीपुरता न राहता तीव्र जनआंदोलनात परिवर्तित होईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
आज कासार सिरसीतील नागरिक न्यायाची अपेक्षा करत आहेत—तोही तात्काळ, ठोस आणि प्रत्यक्ष कृतीतून. कारण हा प्रश्न केवळ रस्त्यांचा नाही, तर हजारो लोकांच्या दैनंदिन जगण्याचा आणि त्यांच्या हक्काच्या सुविधांचा आहे. प्रशासनाने आता तरी संवेदनशीलता दाखवून ठोस निर्णय घेतले, तरच या जनतेचा विश्वास परत मिळू शकतो…