विनापावती पैसे उकळून बनावट ८/अ देत अशिक्षित महिलेला गंडा
दोषी ग्रामसेवकावर तात्काळ निलंबनाची मागणी..
निलंगा,दि.२८
कासार सिरसी येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाकडून गोरगरीब व अशिक्षित नागरिकांची सर्रास आर्थिक लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विनापावती पैसे उकळून खोटी व बनावट नमुना नंबर ८/अ देत एका अशिक्षित महिलेला फसवणूक केल्याचा गंभीर आरोप ग्रामसेवकावर करण्यात आला असून, या प्रकरणी निलंगा येथील मा. गटविकास अधिकारी यांच्याकडे तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे कासारसिरसी येथील रहिवासी सौ. मंगलाबाई केरबा मंमाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मालकीचा प्लॉट ग्रामपंचायत दप्तरात नोंद असताना देखील नियमाप्रमाणे माहिती न देता चुकीची, खोटी व बनावट नोंद करून ८/अ देण्यात आले. एवढ्यावरच न थांबता, “अट काढण्यासाठी दोन हजार रुपये लागतील” असे सांगून संबंधित ग्रामसेवकाने पैसे घेतले. पावती देण्याचे आमिष दाखवूनही एकही पावती न देता थेट पैसे हडप करण्यात आले, हा प्रकार म्हणजे शासकीय नियमांची उघडपणे पायमल्ली आहे.
तक्रारदार सौ. मंगलाबाई मंमाळे व त्यांचे पती केरबा मंमाळे हे दोघेही अशिक्षित असून, हातावर पोट असणारे रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. अशा कष्टकरी, भोळ्या-भाबड्या नागरिकांना लक्ष्य करून शासकीय कर्मचारीच जर लूट करत असतील, तर सामान्य माणसाने न्याय मागायचा कुणाकडे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या घटनेमुळे कासार सिरसी ग्रामपंचायत कार्यालयाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
“पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही”, “बनावट कागदपत्रे देऊन नागरिकांना अडचणीत टाकले जाते” असे प्रकार येथे सर्रास सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
दोषी ग्रामसेवकावर कठोर कारवाईची जोरदार मागणी होत आहे.
या प्रकरणी,
संबंधित ग्रामसेवकावर तात्काळ निलंबन करण्यात यावे.
घेतलेले पैसे व्याजासह परत देण्यात यावे.
बनावट कागदपत्रे दिल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
ग्रामपंचायत व्यवहारांची सखोल चौकशी
करण्यात यावी, अशी जोरदार मागणी तक्रारदारांसह कासार सिरसीतील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जर अशा प्रकारच्या भ्रष्ट व लुटारू कर्मचाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली नाही, तर ग्रामपंचायत व्यवस्थेवरील जनतेचा उरलेला विश्वासही संपुष्टात येईल, अशी तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
आता याबाबत पंचायत समिती निलंगा चे गटविकास अधिकारी एस जी पाटील काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
