निलंगा,दि.22
कासार शिरसी शहरालगतच्या शिवपानंद रस्त्यासह महत्त्वाच्या पानंद रस्त्यांची कामे वर्षानुवर्षे रखडलेली असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा संताप नागरिक व शेतकऱ्यांतून उफाळून आला आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाला आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन वाहतुकीला अत्यंत आवश्यक असलेले हे रस्ते आजही अर्धवट, अडगळीत आणि दुर्लक्षित अवस्थेत आहेत.
कासार शिरसी–नारंगवाडी मार्गावरून सोनामाता डोंगराकडे जाणारी जुनी निलंगा गाडीवाट, याच मार्गावरील पवन ऊर्जा केंद्र, नाकाडा डोंगर ते थेट उद्धव टेकडी–उमरगा मेन रोडला जोडणारा शिवपानंद रस्ता हे मार्ग विकासाच्या दृष्टीने कणा ठरणारे असताना प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पानंदमुक्त अभियानांतर्गत काही ठिकाणी कामे झाल्याचे दाखवले जात असले, तरी कासार शिरसी शहर परिसरात अनेक महत्त्वाची कामे अद्याप प्रलंबितच आहेत. हत्तरगा ते सोनामाता डोंगर–शिराढोण हा रस्ता नुकताच मंजूर झाला, पण उर्वरित रस्त्यांचे काय? असा थेट सवाल नागरिक प्रशासनाला विचारत आहेत.
स्मशानभूमीजवळील ओढ्यालगत दुतर्फा नाली बांधकाम करून परिसर प्रशस्त करण्याची मागणी धूळ खात पडून आहे. येथून सोनामाता डोंगराकडे जाणारी जुनी गाडीवाट पानंदमुक्त करून रुंद केल्यास शहराच्या जुन्या भागातील नागरिकांना नव्या तहसील कार्यालयापर्यंतचा सर्वात सोपा आणि जवळचा मार्ग उपलब्ध होईल. मात्र ही साधी बाबही प्रशासनाच्या अजेंड्यावर नाही, हेच दुर्दैव आहे.
पवन ऊर्जा केंद्रापासून बाह्य वळण मार्गाअंतर्गत नाकाडा डोंगर मारुती मंदिर ते थेट उद्धव टेकडीमार्गे कासार शिरसी–उमरगा मुख्य रस्त्यापर्यंतचा पानंद रस्ता आजही कागदावरच अडकलेला आहे. या रस्त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचा प्रश्न सुटू शकतो, तरीही कामे सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे.
हत्तरगा रोड–चिंचनसुरे यांचा मळा–बडी बेस ते भीमनपा पूल, तसेच तक्क्याच्या विहिरीपासून कैकाडी गल्ली–मिलगीरे–व्यवहारे–चिंचनसुरे पाटील यांच्या शेताजवळून भगतवाडीला जाणारी जुनी वागदरी वाट वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. हे सर्व मार्ग विकासाचे रक्तवाहिन्याच असताना त्याकडे होत असलेले दुर्लक्ष म्हणजे कासार शिरसीच्या प्रगतीवर घाला घालण्यासारखे आहे.
आता आश्वासन नकोत, कामे हवीत!
शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी या सर्व पानंद रस्त्यांची कामे तातडीने सुरू न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही संतप्त नागरिकांकडून देण्यात येत आहे. प्रशासनाने अजून किती काळ कानाडोळा करायचा, हा प्रश्न आता थेट जनतेकडून उपस्थित केला जात आहे.